रत्नागिरी : पावसाळा सुरू झाल्याने ऑगस्ट महिन्यापर्यंत खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, खाडीतून काही प्रमाणात मासे मारून बाजारात आणले जात आहेत. मात्र, माशांची मरतूक कमी असल्याने त्यांचे दरही गगनाला भिडले आहेत.
खोदलेल्या चरी जैसे थे
पाचल : राजापूर तालुक्यातील पूर्व परिसरात भूमिगत पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेल्या चरी अद्यापही जैसे थे असल्याने शेतकरी तसेच बागायतदार यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाळ्यात या चरींमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने असे बेजबाबदार काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
डीपीला वेलींचा वेढा
चिपळूण : पावसाळी हंगामापूर्वी दरवर्षी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून सर्वत्र झाडे व फांद्या तोडण्याचे काम केेले जाते. मात्र, चिपळूण शहरातील भेंडीनाका येथील डीपी पूर्णपणे वृक्षवेलींनी वेढला गेला आहे. येथे नागरी वस्ती मोठी आहे. विद्युत पुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी डीपी लावण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यात १०० टक्के लसीकरण
सावर्डे : कोरोनाला आपल्या गावाच्या वेशीवरच रोखून धरणाऱ्या तालुक्यातील तळवडे गावात पहिल्या टप्प्यात १०० टक्के लसीकरणाची मोहीम राबविण्यात ग्रामपंचायतीला यश आले आहे. या मोहिमेला ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गावामध्ये कोरोना रुग्ण सापडू नये, यासाठी तळवडे ग्रामपंचायत, ग्राम कृती दलामार्फत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाच्या भीतीने रुग्णांची पाठ
मंडणगड : तालुक्याच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा गेल्या एक महिन्यापासून बंद करण्यात आलेला बाह्य विभाग ७ जून रोजी भिंगळोली येथील काेविड रुग्णालयातच सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या अजब निर्णयाबद्दल तालुक्यात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसामान्य रुग्णांनी बाह्यरुग्णांकडे पाठ फिरविली आहे.
शेतीकामांना वेग
देवरुख : सलग दुसऱ्या दिवशीदेखील चिपळुणात वातावरण चांगले राहिले आहे. पावसाची रिपरिप दिवसभर सुरू राहिली. मात्र, मुसळधार पाऊस किंवा वादळवारे नव्हते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दुसऱ्या दिवशीदेखील दिलासा मिळाला आहे. तसेच समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.
राजापुरात बांबूची शेती
राजापूर : कोकणात सामायिक जमिनीच्या वाटपाचे भिजत घोंगडे तसेच पडलेले आहे. थोड्याफार सामायिक जमिनीवर लागवड झालेली दिसते. ज्यांनी जमिनी विकत घेतल्या आहेत आणि ज्यांचे स्वतंत्र ७/१२ उतारे आहेत, त्यांच्या जमिनीत फळबागा बहरलेल्या आहेत. मात्र, तालुक्यातील काही लोकांनी बांबूची लागवड केली आहे.
वीजपुरवठा राहणार सुरळीत
सावर्डे : सावर्डे गाव आणि जोडलेली डेरवण ते मंजुत्रीपर्यंतची अशी १० ते १२ गावे एकाच फीडरवर असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. डेरवण ते मंजुत्री या ठिकाणी वीज खंडित झाली, तर सावर्डे गावातील वीजपुरवठा खंडित होत होता; परंतु आता दुर्गेवाडी फीडर नव्याने कार्यान्वित करण्यात आल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत राहणार आहे.
शासकीय इमारतींत निर्जंतुकीकरण
साखरपा : साखरपा ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या परिसरातील शासकीय इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, तळवाडी अंगणवाडी, शाळा साखरपा क्रमांक २, पोलीस ठाणे व महात्मा गांधी विद्यालय, साखरपा येथे फवारणी करण्यात आली.