आंजर्ले : दापोली शहरात लवकरच प्रशस्त आणि सर्व सोयींनी युक्त असे अत्याधुनिक मच्छी मार्केट उभे राहणार आहे. यासाठी १ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.दापोलीत सुसज्ज आणि अत्याधुनिक मच्छी मार्केट व्हावे, अशी गेल्या कित्येक वर्षांची मच्छिमार आणि ग्राहकांची मागणी होती. दापोली शहरात सद्यस्थितीत मच्छिमार महिलांनी शेड म्हणून उभारलेले मच्छी मार्केट आहे. पत्र्याच्या या शेडमध्ये बसून महिला मासे विक्री करतात. येथे कोणत्याच सुविधा नाहीत. त्यातच सद्यस्थितीत सुरू असलेल्या या मार्केटच्या जागेवरून दापोली नगरपंचायत व मच्छी विक्रेत्या महिलांमध्ये वाद सुरू आहे. हा वाद न्यायालयात आहे. काही दिवसांपूर्वीच या मच्छी विक्रेत्या महिलांची अन्य ठिकाणी योग्य सोयीसुविधांसह व्यवस्था होत नाही, तोपर्यंत त्यांना आहे त्या जागेत व्यवसाय करू द्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. आता राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय महामंडळाने दापोली शहरात अत्याधुनिक मच्छी मार्केट उभारण्यासाठी १ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. हे मंजुरीचे पत्र महामंडळाने १८ डिसेंबर २०१३ रोजी दापोली नगरपंचायतीला दिले आहे. दापोली नगरपंचायतीने याबाबतचा प्रस्तावही प्रशासनाला सादर केला आहे.मच्छी मार्केटच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यताही मिळाली आहे. या मच्छी मार्केटसाठी १ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून मिळणार आहे, तर १९ लाख दापोली नगरपंचायतीकडून खर्च करण्यात येणार आहेत. या मच्छी मार्केटमध्ये कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मच्छी विक्रेत्या महिलांची मोठी सोय होणार आहे. काही कारणास्तव विकण्यास आणलेले मासे विकले गेले नाहीत, तर ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवता येतील व ते दुसऱ्या दिवशी विकता येतील. सद्यस्थितीत कोल्ड स्टोरेज नसल्याने संध्याकाळपर्यंत मासे संपले नाहीत, तर ते खराब होतात. त्यामुळे या महिलांना येईल त्या दराला विकावे लागतात. मात्र, आता उभारण्यात येणाऱ्या मच्छी मार्केटमुळे या मच्छी विक्रेत्या महिलांचे आर्थिक नुकसान टळणार आहे.कोल्ड स्टोरेजबरोबरच या महिलांसाठी स्वच्छतागृह, उपाहारगृहाची सुविधाही या मार्केटमध्ये असेल. या मार्केटमध्ये ७० मच्छिविक्रेत्या महिला एकाचवेळी व्यवसाय करू शकणार आहेत. तसेच या नव्या मच्छी मार्केटमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याचबरोबर मार्केटमधून बाहेर येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शुध्दीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. या मार्केटचा आराखडा नगररचनाकारांंकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र, अद्याप तो न मिळाल्याने काम रखडले आहे. त्याचबरोबर, काम सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र त्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. या दोन्ही मंजुरी मिळाल्यावर टेंडर काढून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. (वार्ताहर)निधी मंजूरगेल्या कित्येक वर्षांची मागणी पुर्णत्वाकडेदापोलीत सध्या शेडमध्ये भरतेय मच्छी मार्केट.कोणत्याच सुविधा नसल्याने महिलांची होतेय गैरसोय.नवीन मच्छी मार्केटसाठी १ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर.निधी मंजूरीचे पत्र दापोली नगरपंचायतीकडे सुपूर्द.सध्याच्या मार्केटच्या जागेवरून वाद सुरू.
दापोलीत होणार मच्छी मार्केट
By admin | Published: November 12, 2014 9:08 PM