शिवाजी गोरे दापोली :रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदरात मासेमारी हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मासेमारीसाठी बोटी समुद्रात रवाना झाल्या असून, बोटींना परकीय चलन मिळवून देणारे मासेही मिळत आहेत. मात्र, लॉकडाऊनचे कारण पुढे करत हर्णै बंदरातील लिलावात दलालाकडून दर पाडले जात असल्याचा आरोप मच्छीमार बांधवांकडून केला जात आहे. दलालांच्या विरोधात मच्छीमार एकवटले असून, मच्छीला योग्य दर मिळाला नाही तर पुढील काळात मच्छीमार व दलाल यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.डिझलचे दर गगनाला भिडले आहेत. डिझेल, खलाशी, बोटीचे हप्ते आणि इतर खर्चाचा मेळ बसत नाही आणि त्यातच मच्छीमार बांधवांची दलालांकडून लूट सुरू आहे. त्यामुळे मासेमारी परवडत नाही. मासळीला दर मिळत नसल्याने मच्छीमार बांधव चांगलेच हवालदिल झाले असून, शासनाने मासळीला हमीभाव द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.एक ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाली असली तरी गेले दोन महिने सततच्या वादळसदृश परिस्थितीमुळे मासेमारी बोटी अनेक दिवस किनाऱ्यावर होत्या. मासेमारी पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे मच्छिमारांना मोठा फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे ऐन मासेमारी हंगामातच मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मासेमारी बंद होती.
आता नुकतीच मासेमारीला सुरुवात झाली आहे. मासेही चांगले मिळत आहेत. परंतु आता स्थानिक दलालाकडून दर पाडले जात आहेत. त्यामुळे मोठ्या कष्टाने मासेमारी करून आणलेल्या मच्छीवर दलाल डल्ला मारत असतील तर आम्ही मासेमारी करून फुकट मरायचे का, असा प्रश्न मच्छीमार बांधव करत आहेत.निर्यात करणारे मासळी व्यावसायिक मागणी नसल्याचे कारण देत कमी दर देत आहेत. मच्छीमार बांधवांकडून सुरमई, पापलेट, टायनी, रिबन फिश व इतर निर्यात होणाऱ्या माशांना चक्क १० वर्षांपूर्वीचा दर दिला जात आहे. कोरोनाचे कारण देऊन कमी दराने मासळी विकत घेणारे लोक आपल्या केंद्रावर मात्र तिप्पट दराने ती विकत आहेत.
मासळीला जागतिक बाजारपेठेत मागणीच नसेल तर स्थानिक दलाल कोणत्या आधारावर कोट्यवधी रुपयांची मच्छी लिलावात घेतात? दररोज मच्छीचे दरफलक का लावले जात नाही? एक्सपोर्ट करणारे सप्लायर्स व मच्छीमार यांची बैठक का होऊ दिली जात नाही? चीन आणि भारताचे संबंध बिघडले असतील तर इतर देशात निर्यात का केली जात नाही? असे प्रश्न मच्छीमार करत आहेत. पुरेशी मागणी असतानाही केवळ कोरोनाच्या नावाखाली दलाल लुटत असतील तर आम्ही फार काळ सहन करणार नाही, असा इशारा मच्छीमार बांधवांनी दिला आहे.
समुद्रातील वादळ शमल्याने बोटी समुद्रात मासेमारीसाठी रवाना झाल्या आहेत. परकीय चलन मिळवून देणारे मासे बोटीला मिळू लागले आहेत. परंतु चीन व भारत या दोन देशांतील तणावपूर्ण वातावरणाचे दाखले देत, व्यापाऱ्यांडून मच्छिमारांनी आणलेल्या माशांना सध्या कवडीमोल किंमत दिली जात आहे.बाळकृष्ण पावसे,हर्णै बंदर कमिटी अध्यक्ष
मासेमारी करून आणलेल्या मच्छीला योग्य दर मिळावा, अशी मागणी शासनाकडे आहे.भगवान चौगुले,अध्यक्ष, नखवा मच्छीमार संघटना
चीनकडे निर्यात बंद असल्याची दिशाभूल करून मच्छीचे दर पाडले जात आहेत. पण, इतर देशातील निर्यात सुरूच आहे. चांगले मासे एक्स्पोर्ट होत आहेत. परंतु मच्छीमारांना दर मिळत नाही.- यशवंत खोटकर,मच्छीमार, हर्णै बंदर
चीनला मोठ्या प्रमाणात रिबन फिश, प्रॉन्स जातो. परंतु निर्यात बंदीचे कारण देऊन हर्णै बंदरातील स्थानिक सप्लायरकडून मच्छीमारांची पिळवणूक सुरु आहे.डी. एम. वाघे,अध्यक्ष, मच्छीमार सोसायटी, हर्णै
हर्णै बंदरातील दलाल मच्छीमार बांधवांकडून कमी दराने मच्छी घेऊन जादा दराने आपल्या मच्छी सेंटरवर विकत आहेत. यामध्ये शासनाने लक्ष घालावे.- गणेश चौगुले, मच्छीमार, हर्णै