रत्नागिरी : जिल्ह्यात मासेमारी नौकांसह मासळीचे उत्पादनही गतवर्षी कमी झाले आहे. सन २०२१-२२ च्या तुलनेत गेल्यावर्षी २०२२-२३ मध्ये ४१६ मच्छीमार नौका कमी झाल्या. त्याचवेळी मासळीचे उत्पादनही ३८,५११ मेट्रिक टनांनी कमी झाले आहे. मासळीची घटती उत्पादकता आणि नौकांची कमी हाेणारी संख्या यामुळे मासेमारी व्यवसायाला आता घरघर लागली आहे.जिल्ह्यात मासेमारी उद्योग महत्त्वाचा मानला जात असला तरी गेल्यावर्षी मासेमारी उद्योगातील नौकांचे प्रमाण कमी झाल्याचे समाेर आले आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक करून अपेक्षित मासळीचा ‘रिपोर्ट’ मिळत नसल्याने मासेमारी नौका विकण्याकडे कल वाढला आहे.मासेमारीच्या हंगामात अनेक नैसर्गिक संकटांमुळे मासेमारीचे दिवस वाया जात असल्याने आर्थिक ताेटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांनी नौका विकण्याचा निर्णय घेतला.जिल्ह्यात सन २०२१-२२ मध्ये २,९३६ मासेमारी नौका होत्या. त्यामध्ये २,२५२ यांत्रिकी नौका होत्या. या मासेमारी नौकांना त्या वर्षात १ लाख १२ हजार २८ मेट्रिक टन मासे मिळाले होते. तर सन २२-२३ मध्ये २,५२० नौका राहिल्या. या नौकांना केवळ ६२,७१७ मेट्रिक टन इतकेच मासे मिळाले. सन २०२१-२२ च्या तुलनेत गेल्या वर्षात मच्छीमार नौका ४१६ ने कमी झाल्या तरी मासळी मिळण्याचे प्रमाण ३८,५१८ मेट्रिक टनांनी कमी झाले.
- रत्नागिरीच्या सागरी क्षेत्रात गतवर्षी ६८,४२४ मेट्रिक टन मासळी मिळाली, सन २०२१-२२ मध्ये याच सागरी क्षेत्रात ४२,३८६ मेट्रिक टन मासे मिळाले होते.
- दापोली तालुक्यात सन २०२१-२२ मध्ये १७,२९० मेट्रिक टन मासळी मिळाली होती. गतवर्षी याच मोसमात १२,४३७ मेट्रिक टन मासळी मिळाली.
- गुहागरात २,८२२ मेट्रिक टन मासळी मिळाली होती. गेल्या वर्षी मात्र १,५४२ मेट्रिक टन मासळी मिळाली.
- राजापूर तालुक्यात १२,१७२ मेट्रिक टन मासळी मिळाली होती. गेल्या वर्षी हे प्रमाण निम्म्याने घटून ५,८७८ मेट्रिक टनांवर आले.
- मंडणगड तालुक्याच्या सागरी क्षेत्रात ५२० मेट्रिक टन मासे मिळाले हाेते. तो गेल्यावर्षी ४७४ मेट्रिक टनांवर आला.
तालुकानिहाय मासेमारी नौका
- रत्नागिरी -१६५१
- गुहागर - १८४
- दापोली - ५३९
- मंडणगड - १५
- राजापूर - १३१