रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय खात्याच्या पथकाने मिरकरवाडा बंदरामध्ये धडक कारवाई मोहिमेच्या माध्यमातून ९ बिगर परवाना पर्ससीन नौका आणि बेकायदेशीरपणे एलईडीचा वापर करणाऱ्या ३ अशा एकूण १२ पर्ससीननेट नौकांवर कारवाई केली. त्यामुळे पर्ससीन नेटधारकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरी शहराजवळील मिरकरवाडा बंदर हे राज्यातील मच्छी उतरविण्याचे महत्त्वाचे बंदर आहे. या बंदरामध्ये मासेमारी व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल चालते. त्यामुळे या बंदरात मच्छिमारांची कायम रेलचेल असते. सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांच्या पथकांनी मिरकरवाडा बंदरात अचानक तपासणी मोहीम सुरु केली आहे. सागरी मासेमारी अधिनियमानुसार आवश्यक असणाऱ्या मासेमारी नौकांची मूळ कागदपत्रे तपासण्यात येत आहेत. या तपासणीमध्ये मासेमारी परवाना, बंदर परवाना तसेच नौकेवर वापरल्या जाणाऱ्या जाळ्यांसंबंधीच्या कागदपत्रांची पाहणी करण्यात येत आहे. या अचानक झालेल्या तपासणीमध्ये मिरकरवाडा बंदरामध्ये २५ पर्ससीननेट नौकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ९ पर्ससीननेट नौका विनापरवाना असल्याचे उघड झाले. ही कारवाई सुरु असताना मच्छिमारांची धावपळ उडाली होती. या नौकांवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय ना. वि. भादुले यांच्याच मार्गदर्शनाखाली माऊली साई गस्ती नौकेच्या माध्यमातून एलईडीने मासेमारी करणाऱ्या ३ पर्ससीननेट मासेमारी नौकांवर कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईमध्ये १०८ एलईडी लाईट्स, ४ बॅलार्ड, होल्डर व वायर आदी सुमारे १७ लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. या तिन्ही मासेमारी नौका मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्य खात्याने अवरुध्द करुन ठेवल्या आहेत. ही कारवाई भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, त्यामध्ये मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाचे मत्स्य विकास अधिकारी र. प्र. राजम, गुहागरचे परवाना अधिकारी सं. अ. देसाई, नाटेचे परवाना अधिकारी प्र. ल. महाडवाला, दाभोळचे परवाना अधिकारी दी. आ. साळवी, तृ. ध. जाधव, सुरक्षा पर्यवेक्षक तुषार करगुटकर आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
चौकट
पर्ससीननेट मासेमारी बंद करण्याचा हा डाव आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय उद्ध्वस्त झाल्यास अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असून, उपासमारीची वेळ येणार आहे. त्यासाठी मच्छिमारांनी सावध भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याने मच्छिमारांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्यांना वेळीच अद्दल घडवली पाहिजे, अशा संतप्त प्रतिक्रिया पर्ससीननेट मच्छिमारांमधून उमटत आहेत.