रत्नागिरी : साेसाट्याच्या वाऱ्यामुळे मच्छिमारी नाैका भरकटत ब्रेक वॉटरच्या वॉलला आदळल्याने नौकेला जलसमाधी मिळाल्याची घटना साेमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान मिरकरवाडा येथे घडली. नौकेवरील तांडेल व खलाशी यांनी पाण्यात उडी मारून पोहत किनारा गाठल्याने त्यांचे प्राण वाचले.
ही नौका जिक्रिया लतीब पटेल व अन्य २ जणांच्या मालकीची आहे. साेमवारी सकाळी ते नाैका घेऊन पांढऱ्या समुद्रावरून भगवती बंदर याठिकाणी जात होते. मध्यभागी नौका गेली असता इंजिनमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याने बंद पडले. वाऱ्याच्या वेगामुळे नौका भरकटून खडकावर आदळली आणि आडवी झाली. नौका बुडल्याने त्यामध्ये पाणी शिरू लागले. प्रसंगावधान राखत तांडेल व खलाशांनी पाण्यात उड्या टाकून ते पाेहत समुद्रकिनारी आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. नाैका बुडल्याचे कळताच स्थानिक मच्छिमार मदतीसाठी धावले. याठिकाणी सीमा शुल्क विभागाचे अधिकारीही घटनास्थळी हजर झाले. मात्र, नौकेला वाचवण्यात अपयश आले. नौकेवर असलेल्या क्रेड जाळ्यासह सर्व सामान पाण्यात बुडाले, तर त्यातील काही सामान तरंगत किनाऱ्याला लागले व ते पांढरा समुद्र येथे लागले. या नौकेचे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.