रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय खाते काहीच कारवाई करत नसल्याने शहराजवळील मिऱ्याबंदर येथे बेकायदेशीरपणे मासेमारी करणारी परराज्यातील यांत्रिकी नौका स्थानिक मच्छिमारांनी पकडली. त्यानंतर त्या नौकेवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मच्छिमारांनी मत्स्य विभागातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्याची घटना नुकतीच घडली.
या परराज्यातील यांत्रिकी नौकेचे नाव जॉफी (आयएनडी - टीएन - १५ एमएम - ७२४८) असे आहे. ही नौका पकडल्यानंतर मच्छिमारांनी तत्काळ मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर अधिकारी घटनास्थळी हजर झाले. मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नौकेवरील खलाशांची विचारपूस केली असता एका स्थानिकाने या नौकेला बोलावल्यानेच ती मिऱ्याबंदर येथे आल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिऱ्याबंदर येथे कारवाई न करता ती यांत्रिकी नौका मिरकरवाडा बंदरात घेऊन गेले. नौका ताब्यात घेतल्यानंतर मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली आणि ती कारवाई कधी करणार, असा प्रश्न मच्छिमारांना पडला असल्याचे विशाल मुरकर, विरेंद्र नार्वेकर, रणजित भाटकर, श्रीदत्त भुते, अतुल भुते, दत्तगुरु कीर, आप्पा वांदरकर यांनी सांगितले.