प्रकाश वराडकर --रत्नागिरी --रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाच्या विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यल्प दरात न्याहरी देण्याचा समितीचा मानस आहे. लातूर बाजार समितीच्या एक रुपयात भोजन पॅटर्ननुसार ही योजना असून, जूनअखेर होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाईल. ही माहिती बाजार समितीचे सभापती गजानन पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज शेतकरी खरेदी-विक्री व्यवहारांसाठी येतात. त्यांना समितीमार्फत एक रुपयात जेवण देण्याची योजना राबवण्यात आली आहे. त्यासाठी व्यापारी, अडते तसेच अन्य संबंधितांची मदत घेण्यात आली आहे. रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीनेही रुपयात नव्हे; तर पाच रुपयात तेथे येणाऱ्या शेतकऱ्यांना भोजन उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना आमदार उदय सामंत यांनी आपल्याला केली आहे, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.रत्नागिरी बाजार समितीच्या आवारात अत्यल्प दरात भोजन देणे शक्य आहे. मात्र, समितीच्या आवारात भाजी व शेतमालाचे व्यवहार हे सकाळी ७ ते ९ या दोन तासात होतात. दुपारच्या वेळी हे व्यवहार नसतात, त्यामुळे तेथे शेतकरीही नसतात. परिणामी भोजन देण्याची योजना येथे राबविता येणे कठीण आहे. मात्र, सकाळच्या वेळी शेतकऱ्यांना अत्यल्प दरात न्याहरी अर्थात चहा, नाश्ता उपलब्ध करून देणे शक्य आहे. तशी योजना राबवण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. त्याचा निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या संचालकांच्या बैठकीत घेतला जाणार आहे. व्यापाऱ्यांबरोबरच जिल्हा बॅँकेचीही मदत घेतली जाऊ शकते, असेही ते म्हणाले. निवास व्यवस्थाकृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना सायंकाळी उशिर झाला तर त्यांच्या निवासाचीही व्यवस्था रत्नागिरीच्या समितीने २०१० मध्येच केली आहे. महिला व पुरुष असे दोन हॉल तयार करण्यात आले असून, प्रत्येक हॉलमध्ये दहा गाद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाशे शेतकऱ्यांना होणार लाभ!बाजार समितीच्या आवारात दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत शेतमालाची लिलाव प्रक्रिया होते. त्यावेळी पाचशे ते सहाशे शेतकरी उपस्थित असतात.या शेतकऱ्यांना अत्यल्प दरात न्याहरी उपलब्ध करून देणे शक्य आहे. लातूर बाजार समितीने राबवलेल्या ‘एक रुपयात भोजन’पॅटर्नप्रमाणेचही योजना राबवण्याचा विचार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार कमी दरात न्याहरी
By admin | Published: June 16, 2016 10:54 PM