देवगड : देवगड बंदरातील गणपत भिकाजी निकम यांची पुण्यश्री नौका २२ वावमध्ये मच्छीमारी करत असताना, अचानक पेटली. यात एक खलाशी गंभीररीत्या जखमी झाला. नौकेचे सुमारे १० लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने स्थानिक मच्छिमार इतर नौका, तसेच सागरी सुरक्षा विभागाच्या स्पीड बोटीने घटनास्थळी जाऊन नौकेवरील आठ खलाशांना सुखरूप बाहेर काढले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यश्री नौकेला अचानक लागलेल्या आगीत खलाशी महेंद्र यशवंत कांबळे (६०, रा.कोलते, लांजा, जि. रत्नागिरी) हे गंभीररीत्या भाजले. त्यांचा उजव्या पायाला, मांडीला भाजुन दुखापत झाली. नौकेला आग लागल्याचे समजताच बाजुला मच्छिमारी करणाऱ्या नौकांनी या नौकेवरील कर्मचाऱ्याना बाहेर काढून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच देवगड सागरी सुरक्षा पोलिस विभागाचे प्रभारी पोलिस अधिकारी गणेश आनंद तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संपत जगताप, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोहन पाटील, शिवराज जयप्रकाश कोयंडे, पोलिस नाईक अमृता बोराडे आदी पोलिस कर्मचारी पंचगंगा या स्पीड बोटीने घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी जखमी महेंद्र कांबळे या खलाशावर प्रथमोपचार करून तत्काळ स्पीड बोटीने देवगड बंदरात आणले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, तारामुंबरी मच्छिमारी संस्थेचे अध्यक्ष विनायक प्रभू हे देवगड बंदर येथे उपस्थित होते.