रत्नागिरी : येथील राजिवडा परिसरातील फणसोपकर यांची अलीना नामक मासेमारी नौका रत्नदुर्ग किल्ल्यासमोरील समुद्रात मासेमारी करत असताना बुडाल्याची घटना आज पहाटे ४ वाजता घडली. या दुर्घटनेत रामचंद्र केशव पवार (वय ६५, रा. सोमेश्वर-बौद्धवाडी, ता. रत्नागिरी) हे बेपत्ता झाले आहेत. मत्स्य खाते आणि कोस्टगार्ड यांच्यातर्फे त्यांचा शोध सुरू आहे.
नारळी पौर्णिमेला मासेमारीला काही अंशी सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात नौका नेणे धोक्याचे बनले आहे. राजीवडा येथील फणसोपकर यांच्या मालकीची 'आयएनडी-एमएच-४-एमएम - २२८५' या क्रमांकाची अलीना नावाची नौका १४ ऑगस्ट सोजी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्याने मासेमारीसाठी गेली होती. या नौकेवर आसिफ जाफर जांभारकर हे तांडेल होते.
मासेमारीसाठी किल्ल्यासमोर ८ फॅदम ( वाव ) खोल समुद्रात जाळे टाकण्यात आले होते. त्याचवेळी पाण्याच्या तीव्र प्रवाहाने नौका किल्ला किनारी वाहून आली. योग्य वेळी नौकेचे इंजिन सुरू न झाल्याने नौका खडकावर आदळली. त्यात नौकेचे तुकडे-तुकडे झाले. त्यानंतर नौकेचे काही भाग किनाऱ्याला आले होते. हे भाग किनाऱ्यावरील ग्रामस्थांना दिसल्यानंतर या घटनेची माहिती कळली.
यामध्ये रेहबर उमर जांभारकर (रा. पडवे), विकास रामप्रकाश चौधरी, आसिफ जाफर जांभारकर, मुश्ताक अली भाटकर (तिघे राहणार राजीवडा) हे जखमी झाले. या सर्वांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रेहबर याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. अन्य तिघांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, या नौकेवरील रामचंद्र केशव पवार हे बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोस्टगार्डच्या मदतीने समुद्रात शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या दुर्घटनेबाबत रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.