रत्नागिरी: राजिवडा येथील सादिक म्हसकर स्वतःची मासेमारी नौका घेऊन सोबत अन्य दोन मच्छिमार घेऊन दि. १४ सप्टेंबर २०१९ रोजी पहाटे ५ वाजता समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. नौकेच्या पंख्यात जाळे अडकून नौकेचे इंजिन बंद पडले आणि नौकेला जलसमाधी मिळाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.कुर्लीसमोर ४ वाव खोल पाण्यामध्ये मासेमारीसाठी जाळे टाकले सकाळी ७:३० वाजता जाळे ओढायला सुरुवात केली. लाटा आणि पाण्याच्या प्रवाहाने जाळे नौकेच्या पंख्यामध्ये जाळे अडकून नौकेचे इंजिन बंद पडल्याने नौका भरकटून लाटांच्या तडाख्यात सापडली. मोठ्या उसळणाऱ्या जोरदार लाटांच्या तडाख्याने फायबर नौकाचा मागील भाग तुटला आणि नौकेत पाणी शिरुन नौका बुडू लागली.
जवळ मासेमारी करणाऱ्या अन्य मासेमारी नौका तातडीने मदतीसाठी येऊन नौकेवरील तीन मच्छिमारांना आपल्या नौकेवर घेऊन त्यांना वाचवले. नौका वाचविण्यासाठी बुडणाऱ्या नौकेच्या नाळेला(नौकेचा पुढील भाग) दोरखंड बांधून नौका ओढत असताना नाळ निखल्याने पाण्याने भरलेल्या नौकाने सागराचा तळ गाठला. या घटनेत प्राणहानी झाली नसली तरी म्हसकर यांची नौका बुडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.