रत्नागिरी : एकीकडे कायद्याविरोधात आंदोलन, तर दुसरीकडे पर्ससीन मच्छिमारांकडून कायदा धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे मासेमारी सुरुच आहे. साखरीनाटे परिसरातील पर्ससीननेट नौकांकडून खोल समुद्रात राजरोसपणे मासेमारी केली जात असल्याचा आराेप स्थानिक पारंपरिक मच्छिमारांकडून करण्यात येत आहे.
पर्ससीननेट, मिनी पर्ससीन, एलईडी मासेमारीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या मत्स्य विभागाने आणलेल्या नव्या कायद्याचा चांगलाच फायदा मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून उठविला जात आहे. एकीकडे एलईडी, पर्ससीननेट मासेमारीला बंदी असतानाही अशी मासेमारी तेजीत सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. या मासेमारीकडे संबंधित अधिकारी डाेळेझाक करत असल्याचा आराेपही पारंपरिक मच्छिमारांनी केला आहे.
पर्ससीननेटधारक मच्छिमारांचे जिल्हाभरात आंदोलन सुरु आहे, तर त्यांच्याकडूनच मासेमारी केली जात असल्याचे पारंपरिक मच्छिमारांचे म्हणणे आहे. मासेमारी सुरु असल्यानेच बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या पर्ससीननेट नौकांना पारंपरिक मच्छिमांराकडून पकडून मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येत आहे. मात्र, मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून स्वत:हून केवळ दिखाव्यापुरती कारवाई केली जात आहे. त्यामुळेच बेकायदेशीर मासेमारीला खतपाणी घालण्याचे काम मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
रत्नागिरी परिसरात किनारपट्टीवरील गावातील पर्ससीननेट नौकांची बेकायदेशीरपणे मासेमारी सुरु असतानाच राजापूर तालुक्यातील साखरीनाटेसह इतर परिसरातील पर्ससीननेट नौकांकडून नियम धाब्यावर बसवून मासेमारी करण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरातील पारंपरिक मच्छिमार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. आंदोलन सुरु असताना बेकायदेशीरपणे करण्यात येत असलेल्या पर्ससीननेट मासेमारीकडे लक्ष कोण देणार, असा प्रश्न पारंपरिक मच्छिमारांनी उपस्थित केला आहे.
माशांच्या पिल्लांचीही मासेमारी
पर्ससीननेट मासेमारीला चार महिने बंदी असतानाही व पर्ससीननेट अनेक नौकांकडे परवाना नसतानाही बहुतांश मिनी पर्ससीन नेटधारक नौका वर्षभर मासेमारी करीत आहेत. या मासेमारीत माशांच्या पिल्लांचीही मासेमारी केली जात असल्याने काही वर्षात मासे मिळण्याचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार उद्ध्वस्त होणार आहेत.