रहिम दलाल-- रत्नागिरी =--खलाशी नसल्याने अनेक मासेमारी नौका बंदरामध्ये नांगरावर उभ्या आहेत. लाखो रुपयांची रक्कम आगाऊ घेऊनही खलाशी न परतल्याने नौकामालकांसमोर भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.पर्ससीन नेट मासेमारीवर बंदी घालून शासनाने मच्छिमारांच्या तोंडचा घास पळवला होता. त्यामुळे आज मच्छिमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये सर्वांत मोठी अडचण होती आर्थिक पाठबळाची! बँकेकडे हात पसरून ही समस्या दूर केल्यानंतर आता खलाशांची समस्या निर्माण झाली आहे. जानेवारीनंतर पर्ससीन नेटने मासेमारी करणे बंदी घालण्यात आल्याने किनारपट्टीवरील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. त्याचा परिणाम इतरही संबंधित व्यवसायांवर झाला होता. लाखो रुपयांची कर्ज घेतलेल्या नौका मालकांसह टेम्पो मालक, पानपट्टीवाले, मच्छी विक्रेते, मासे कापणाऱ्या महिला तसेच बाजारपेठेतील इतर व्यावसायिकांवर याचा परिणाम झाला असून, सुमारे ७५०० कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. बंदीमुळे गेले सहा महिने खोल समुद्रातील मासेमारी ठप्प झाली होती. त्यावेळी नौकामालकांनी खलाशांना सुमारे तीन महिने तरी मासेमारीविना पगार दिला, शिवाय त्यांच्या खाण्या-पिण्याचाही खर्च उचलला होता. त्यावेळी अनेक खलाशांनी पलायनही केले होते. त्यांना दिलेली अॅडव्हान्स रक्कमही नौका मालकांना त्यांच्याकडून वसूल करता आली नसल्याने ते आर्थिक अडचणी आले होते. काही खलाशांनी मासेमारी सुरु झाल्यानंतर येणार असल्याचा शब्द मालकांना दिला होता. मात्र, मासेमारी १ आॅगस्टपासून सुरु झाली असली तरी अनेक खलाशी अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त नौका आज नांगरावर आहेत. लाखो रुपये आगाऊ देऊनही खलाशी न आल्याने नौकामालक अडचणीत सापडले आहेत. सहा महिने मासेमारी बंद असल्याने त्यांच्याकडे नवीन खलाशांना देण्यासाठीही पैसे नाहीत, अशी परिस्थिती आहे.पर्ससीन नेटने मासेमारी करण्यावर बंदी आदेश दिल्याने मच्छीमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने ते आर्थिक अडचणी सापडले आहेत. तीन महिने पर्ससीन नेट मासेमारी बंद राहिल्याने मच्छीमार संकटात सापडले असून, त्याचे परिणाम खोलवर झाले आहेत. आज त्यांच्याकडे अन्य खलाशांना देण्यासाठी पैसे नाहीत.
खलाशी न परतल्याने मासेमारी अद्याप ठप्पच
By admin | Published: August 24, 2016 10:26 PM