याच काळात तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर त्याचा जास्त प्रभाव पडू शकतो असेही काही ठोकताळे आहेत. तशा बातम्याही आहेत. हा अंदाज धरून शासनाने त्याचीही तयारी सुरू केली आहे. पण एक संशोधन अहवाल सांगतोय की, लहान मुलांमध्ये मुळातच प्रतिकारशक्ती चांगली असते. त्यामुळे ते यावर सहज मात करू शकतात. तरीही काळजी घ्यायलाच हवी...!
साधारण २३ मार्च २०२० पासून मुले घरातच आहेत. मोबाइलच्या या अत्याधुनिक युगात आईवडील मोबाइलवर म्हणून मुलेही मोबाइलवर किंवा टीव्हीच्या पडद्यासमोर. शिवाय मुले रोज कोरोनाचा कहर ऐकतात, म्हणून दोन गोष्टी नक्की घडतात. एक त्यांना काय काळजी घ्यावी हे समजते. दुसरी परिस्थिती स्वीकारणे आणि हे एकलकोंडेपणा किंवा घर कोंडलेपणाचे फ्रस्ट्रेशन पचविण्याची शक्ती मिळते. अर्थात, विभक्त कुटुंबात वर्क फ्रॉम होमच्या काळात आईवडिलांच्या मन:स्थितीवर मुलांची सुखमय तडजोडीची संकल्पना नकारात्मक किंवा सकारात्मक होते. शिवाय एकल बसून राहण्याची सवय, खाण्याकडेही जास्त लक्ष, त्यामुळे याचा आऊटपूट मुलांची जाडी वाढणे, दम लागणे, दमणे, हालचाली मंदावणे, चिडचिडेपणा वाढणे, राग वाढणे अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. ह्या गोष्टींना सामोरे जाणे हे त्या त्या लोकांच्या आणि घरच्या लोकांच्या मन:स्थितीवर अवलंबून असते.
मात्र या जगाच्या पाठीवर प्रत्येक गोष्टीला तोडगा असतो. शोध मार्ग असतो आणि तो यशस्वीच असतो. रत्नागिरीच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलने असाच एक मोफत समर कॅम्प घेतला. त्यात त्यांनी या लहान मुलांच्या मनोरंजनासह त्यांच्या सहज हालचाल कृतींना चालना दिली. या वय ४ ते प्रायमरी गटासाठी झुम्बा नृत्याची संकल्पना राबवली. त्यांच्या स्पोर्ट्स टीचर सपना साप्ते यांनी या झुम्बा नृत्याला मार्गदर्शन केले. आमच्या नातवांच्या निमित्ताने आम्ही हा ‘झुम्बा’ झुमवर बघितला. सर्व मुलांच्या घरची मंडळी, शाळेतील शिक्षक आणि या मुलांनी हा उपक्रम मनसोक्त आनंदाने अनुभवला.
लहान मुलांचे मनोरंजन, त्यांच्या शारीरिक हालचाली, संगीताच्या तालावर होणारे प्राणवायूपूरक व्यायाम म्हणजेच ॲरोबिक एक्झरसाईज यासाठी एक अनुभवी फिजिओथेरपिस्ट म्हणून मला वाटते लहान मुलांना हा व्यायाम रोज करायला आणा. यातून ‘घर कोंबडे’पणामुळे, लोळण्याच्या प्रवृत्तीकडे, भुकेचे नियोजन, पचन आणि लठ्ठपणा, श्वास क्षमता वाढणे, कारण कोविड-१९ चा कुठलाही स्ट्रेन असो, हा प्रत्यक्ष फक्त फुप्फुसांवरच हल्ला चढवतो. मग त्या त्या स्ट्रेनच्या ताकदीप्रमाणे आपली ‘कयामत’ दाखवायला सुरुवात करतो. साहजिकच झुम्बासारख्या हिकमती व्यायामामुळे फुप्फुसे मजबूत, मग श्वास मजबूत, श्वास मजबूत तर संसर्गाला थोपवून धरण्याची क्षमता मजबूत, सोबत सकारात्मक, होकारात्मक, निर्मितीक्षम हार्मोन्स एण्डॉरफिन्सचे निमित्त मजबूत, म्हणजे बालकांचे आरोग्य आनंददायी. असे अनेक आरोग्य पोषक तत्त्वे या झुम्बामध्ये आहेत. म्हणून दररोज साधारण अर्धा तासाचा हा ‘झुम्बा’ आपल्या मुलांना सक्षम करेल. त्यांची प्रतिकारशक्तीही वाढवेल. त्यांचे मनोरंजन आणि तुमचे मनोरंजनही करेल आणि घराचे आरोग्य सुधारेल. कारण मुलांसोबतचा हा आनंददायी वेळ हाही एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा आरोग्यदायी मार्ग आहे. काळजी घेतलीत तर आपल्या मुलांची देशाची ही संपत्ती कोरोनापासून सुरक्षित आहे, संरक्षित आहे...!
- डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी