‘कोरोना - नको ना’साठी म्हणूनच महाराष्ट्र शासनाने कडक निर्बंध लादले आहेत. १५ मे पर्यंत ते वाढविले आहेत. लसीकरण मोफत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे मंत्रिमंडळ आणि प्रशासन यासाठी नक्कीच अभिनंदनीय ठरते. त्याच वेळेस १७ ते ४४ वयोगटाचे ६ महिन्यांत लसीकरण पूर्ण करणार असे आरोग्यमंत्र्यांचे राजेश टोपे यांचे सकारात्मक विधान पुढच्या भविष्यातील येईल किंवा न येईल अशी तिसरी लाट थोपविण्यास ढालीसारखे कोरोना युद्धात उपयोगी ठरेल. जन आणि जीवनाच्या दूरदृष्टीसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. लसीकरणाची ‘रसद’ मोफत, समूह आरोग्यासाठी ‘पोषक’ डॉक्टर्स, त्यांचे वर्कर्स, आशा वर्कर्स आणि संरक्षक पोलीस कर्मी दिवस-रात्र वैद्यक टास्क फोर्स, संशोधन आणि उपलब्धी याप्रमाणे झटून प्रयत्न करीत आहेत. त्यांचं मनोधैर्य टिकणं आणि घातक कोरोनाच्या युद्धाला हरवणं यासाठी आपण त्यांना साथ द्यायलाच हवी. म्हणून ‘करो-‘ना’चे मंत्र क्रियात्मक, सकारात्मकतेने अमलात आणायलाच हवेत. ते आहेत - १) गर्दी करू नका, २) कितीही निकड-गरज-आव्हान असले तरी मोह टाळून गर्दी होऊ देऊ नका. कारण कोरोनाचे दुष्ट सैनिक आपल्यावर सातत्याने हल्ला करीत राहणार. कारण लसीकरणाच्या तटबंदीला बांधणावळीसाठी अवकाश लागतो. वेळ लागतो. ३) याचा फायदा या कोरोना विषाणूच्या शत्रूंनी पुरेपूर घेतला. इथे आमच्या जनजीवनाला धक्का लागू नये याच्या दृष्टीवर सावट होते. ते दूर झाले; पण उशीर झाला. ४) मात्र आपल्या महाराष्ट्र शासनाने साथ दिली. धडाधड निर्णय घेतले. हाच आरोग्यदायिनी फिटनेस फंडा आहे.
मीच जबाबदार, होय आपण आता जबाबदारी पेलायलाच हवी. कारण कोरोना विषाणूचे दुष्ट सैनिक म्हणतात, ‘मास्क वापराना. मी नको ना, मग मास्क वापराच ना. सुरक्षित अंतर ठेवाचना, कारण मी आता हवेतूनही तुमच्यावर हल्ला करणारच आहे ना, तसेच हात धुवाच ना, नाही तर मी छुपा शत्रू आहे. कुठेही यासाठी थुंकूच नका ना, हल्ल्यासाठी टपलेलाच आहे. ‘जबाबदार’ लोक हेच खरे ‘शूरवीर’ असतात. आपले पालकत्व स्वीकारलेल्या उद्धव सरकारांनी म्हणूनच आपल्याला बचावाचा सकारात्मक, क्रियात्मक आणि होकारात्मक मंत्र दिलाय. म्हणजे तुमच्या श्वसन यंत्रणेतील सैनिकी शस्त्रातील ‘श्वास’ हे शस्त्र शाबूत राहील. हे शस्त्र शाबूत राहिले तर लसीकरणाचा जन आणि जीवनाला हमखास उपयोग होईल. बेडसाठी, ऑक्सिजनसाठी धावाधाव करावी लागणार नाही. हे ऑक्सिजनचे रुग्णालयीन ‘खंदक’ शोधत फिरावे लागणार नाही. उत्तम आरोग्याचा हा एक १९२० च्या फ्ल्यूपासूनचा हा सिद्ध अनुभव आहे. कोरोनाच्या शत्रूची दाणादाण उडविण्याचा हा एक उत्कृष्ट फिटनेस फंडा आहे.
आता शत्रूशी लढायचं म्हणून आपला एकेक योद्धा बलाढ्य हवा म्हणून श्वसनाचे व्यायाम करा, थोडे एरोबिक करा. भारतीय आहारात पोषणमूल्य खूप आहेत, त्याचे सेवन करा, उन्हात बसा, छंद जोपासा, एकमेकांना धीर द्या. एकतेची चेन बळकट करा. म्हणजेच आरोग्य यंत्रणा, पोषक शासन यंत्रणा, संरक्षण पोलिसी यंत्रणा, स्वयंसेवी यंत्रणा यांना साथ द्या. अफवांवर विश्वास नको. गैरसमज पसरविणारे समाजमाध्यमातील मेसेज नको. प्रेमपूर्ण अंत:करण धैर्यपूर्ण वर्तन हेच कोरोना, नकोनाचे शस्त्र आहे. ते आपण परतूया, कोरोनाला हटवूया.
- डाॅ. दिलीप पाखरे