रहिम दलाल- रत्नागिरी -जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागासाठी जिल्हा नियोजनमधून ६ कोटी ९५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, २ कोटी ३० लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे़ त्यातून पाच पशुवैद्यकीय दवाखाने आणि एक कर्मचारी निवासस्थान बांधण्यात येणार आहे़ दापोली तालुक्यासाठी सर्व सोयीनी युक्त तालुका लघु पशुचिकित्सालय उभारण्याची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी होती़ मात्र, आता या चिकित्सालयाच्या इमारतीसाठी २ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आला आहे़ या चिकित्सालयामध्ये १० खोल्या बांधण्यात येणार आहेत़ त्यामध्ये जनावरांसाठी आॅपरेशन थिएटर, ओपीडी, एक्स-रे मशिन, प्रयोगशाळा, सोनोग्राफी सेंटर, छोट्या शस्त्रक्रिया रुम, औषध भांडार, लोकांसाठी प्रतीक्षालय, अधिकारी कक्ष आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कक्षाची सोय करण्यात येणार आहे़ चिपळूण येथील सर्वचिकित्सालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांची सोय नाही़ त्यांच्या निवासस्थानांचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा प्रश्न रेंगाळत होता़ आता त्याला जिल्हा नियोजनकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे़ त्यामध्ये ५ निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत़ त्यासाठी २ कोटी ६० लाख रुपये प्रशासकीय मंजूरी नुकतीच देण्यात आली आहे़ धामणंद (ता़ खेड) येथील पशुसर्वचिकित्सालयासाठी जागेचा प्रश्न भेडसावत होता़ मात्र, त्यासाठी ग्रामस्थांनी ३ गुंठे जागा उपलब्ध करुन दिल्याने जागेचा प्रश्न सुटला आहे़ या चिकित्सालयासाठी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत़ त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मारळ (ता़ संगमेश्वर), केळशी (ता़ दापोली) आणि वाटद-खंडाळा (ता़ रत्नागिरी) या तिन्ही पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारतींना मंजुरी देण्यात आली आहे़ त्यामध्ये प्रत्येक दवाखान्याच्या इमारतीसाठी ४० लाख रुपये असा १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ एस़ सी़ म्हस्के यांनी विशेष मेहनत घेऊन या दवाखान्यांचा आणि कर्मचारी इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता़ त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ६ कोटी ९५ लाख रुपये मंजूर करण्यात आले़ त्यासाठी २ कोटी ३० लाख रुपये पशुसंवर्धन विभागाला निधी प्राप्त झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
पाच दवाखाने, एक निवासस्थान बांधणार
By admin | Published: September 07, 2014 10:47 PM