रत्नागिरी : रत्नागिरीतकोरोनासदृश्य आजाराची लक्षणे असलेले पाच संशयित रुग्ण आढळून आले आहेत. हातीव (ता. राजापूर), गणपतीपुळे व जयगड येथील तिघेजण असून दोनजण पुण्याचे आहेत. या पाचही जणांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बाहेरगावाहून आल्यानंतर त्यांना कोरोनाच्या लक्षणासारखी लक्षणे जाणवू लागल्याने हे सर्वजण स्वत:हून जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या सर्वांना सर्दी-खोकल्याचा त्रास असून प्रकृतीत सुधारणा न झाल्यास त्यांच्या थुंकीचे व थ्रोटचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.याआधी रत्नागिरी जिल्ह्यात ४ संशयित रुग्ण आढळले होते. मात्र, या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये कामानिमित्ताने यातील एकजण ठाण्याला, तर दुसरा पुणे येथे गेला होता. तेथून येताच त्यांना हा त्रास जाणवू लागला. तर दोघेजण पुण्यातून रत्नागिरीत आल्यावर त्यांना त्रास झाला. म्हणून रुग्णालयात दाखल झाले.
या पाचजणांची जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केली आहे. त्यांना असलेला ताप आणि सर्दी - खोकला हा नेहमीचा असल्याचा प्राथमिक कयास असल्याने त्यांना सध्या कोरोनाच्या स्वतंत्र कक्षात ठेवलेले नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितले.सध्या तरी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लोकांनी घाबरुन जाऊ नये तसेच अफवांवरही विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी केले आहे.