रत्नागिरी - गेल्या दोन महिन्यात अनेकदा वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला आहे. या पावसामुळे आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला तर ८७ जनावरांचे बळी गेले. ४८१ घरांची पडझड झाली तर ४४ गोठ्यांचे नुकसान झाले. २७ सार्वजनिक मालमत्ता तर २१ खासगी मालमत्तांचे मिळून सुमारे पाच कोटी रूपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.यावर्षी जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरूवात झाली. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुरू झालेला पाऊस सलग चार दिवस कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे भरली. २ जुलै रोजी कोसळलेल्या पावसाने तिवरे धरण कोसळून त्यात २३ जणांचे बळी गेले. पुन्हा पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे यावर्षी पाऊस सरासरी पूर्ण करेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार बरसण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यात अनेक भागात पुराचे पाणी भरल्याने अनेक घरांचे तसेच सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. १ जून ते ४ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तींच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात पावसामुळे एकूण २८ व्यक्तींचे बळी गेले असून त्यापैकी पुरात वाहून गेलेल्या २२ व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रूपयांप्रमाणे एकूण ८८ लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४५ कुटुंबे आणि १५२ व्यक्ती बाधित झाल्या आहेत.या कालावधीत ४८ पक्क्या व कच्च्या घरांची पूर्णत: पडझड झाली असून १२१ घरांची अंशत: पडझड झाली आहे. ३१२ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली असून ४४ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत नुकसानासाठी ३ पक्की घरे, १३५ अंशत: कच्ची घरे तर १० गोठ्यांना नुकसानासाठी पात्र ठरली आहेत.या पावसात ३४ मोठी दुधाळ जनावरे, ४० लहान दुधाळ जनावरे तर १३ ओढकाम करणाºया मोठ्या जनावरांचा बळी घेतला आहे. त्यापैकी आत्तापर्यंत सहा जनावरांच्या मालकांना मदत देण्यात आली आहे. या कालावधीत २७ सार्वजनिक मालमत्तेचे एकूण ४ कोटी ४५ लाख ९८ हजार ८०० रूपयांचे तर २१ खासगी मालमत्तांचे एकूण २३ लाख ५ हजार २३० असे एकूण ४ कोटी ६९ लाख ४ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.गेल्या दोन महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे जिल्ह्यात पाच कोटीे रूपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्याशिवाय भातशेतीचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून त्यांचे पंचनामे अजून सुरू आहेत.
पावसामुळे रत्नागिरीत सार्वजनिक, खासगी मालमत्तांचे पाच कोटींचे नुकसान, दीड महिन्यांत २८ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 5:18 PM