रत्नागिरी : पोलीस दलाकडून जिल्ह्यात लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी करताना, अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांची एकीकडे ॲन्टिजेन चाचणी केली जात आहे. त्याचवेळी दंडाची कारवाई सुद्धा केली जात आहे. ४ दिवसात अशा १७८७ जणांवर कारवाई करण्यात आली असून, ५ लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
राज्यात सर्वत्र कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये अनावश्यक फिरणाऱ्यांना फटके देण्यात आल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. मात्र यावेळी पोलिसांनी नवी युक्ती काढली असून, अनावश्यक फिरणाऱ्यांची थेट अँटिजेन चाचणी करून, जे पॉझिटिव्ह आलेत त्यांची रवानगी हॉस्पिटलमध्ये केली जात आहे. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये या अनोख्या उपक्रमाची अंमलबजावणी होत आहे.
चाचण्या करतानाच पोलीस दंडात्मक कारवाईही करत आहेत. १५ एप्रिल ते १८ एप्रिल या तीन दिवसात जिल्ह्यात १७८७ लोकांना दंड करण्यात आला आहे. त्यातून एकूण ५ लाख १९ हजार २०० रुपये इतका दंड वसूल झाला आहे.
........................
लोकांनी विनाकारण फिरू नये. प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी पोलीस सज्ज आहेत. त्याअनुषंगाने लोकांनी घरीच राहून सहकार्य करावे. आपल्याला घरपोच धान्य मिळावे, यासाठी प्रशासनाने तजवीज केली आहे. रत्नागिरीकर संचारबंदीला चांगला प्रतिसाद देत आहेत. पण काही नागरिक नियम तोडत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.
- सदाशिव वाघमारे,
उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी