पाली : रत्नागिरी तालुक्यातील पाली विभागात एका दिवसात पाच जण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने ग्रामीण भागात कोरोना पसरण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या १५ दिवसांत आठवड्याच्या फरकाने पाली विभागात १० ते १२ रुग्ण सापडत होते. यामध्ये खुद्द पाली, कापडगाव, खानू, बांबर या गावांमधील रुग्ण सापडले होते. सद्यस्थितीत पाली गावात लॉकडाऊनच्या कार्यकाळात स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेष काळजी घेण्यात येत आहे. या भागात रुग्ण सापडत असून तो भाग निर्जंतूक करण्यात येत असून तेथील ग्रामस्थांना सक्तीने होम क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. शेजारील ग्रामस्थ त्यांच्या संपर्कात येणार नाहीत यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. ही जबाबदारी त्या त्या भागातील ग्रामपंचायत सदस्यांवर सोपविली जात आहे.
मात्र, कोरोनाचा हा प्रादुर्भाव ग्रामीण भागात थांबताना दिसत नाही. काल एका दिवसात पुन्हा ५ कोरोना पॉझिटीिव्ह मिळाले असून पाली येथील मराठवाडी घडशीवाडी आणि पाथरट या ठिकाणी प्रत्येकी एक असे तीन रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली आहे.
खानू गावात पुन्हा एक रुग्ण सापडला असून, नाणीज गावामध्ये पाच- सहा महिन्यांच्या कालावधीत पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. तेथे एक रुग्ण सापडला आहे. पाली विभागात गेल्यावर्षी २३ एप्रिल जे २ रुग्ण सापडले ते नाणीजचे होते. त्यानंतर ४-५ च्या फरकाने २ ते ४ महिन्यांच्या अवधीत रुग्ण सापडत होते. गेले ६-७ महिने गाव शांत होता. मात्र पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.