राजापूर : राज्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाने सुरु केलेली जलयुक्त शिवार अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ४५ गावांची निवड करण्यात आली असून, त्यसामध्ये राजापूर तालुक्यातील तीव्र टंचाईची पाच गावे निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये ताम्हाणे, मोरोशी, खरवते, गोठणे दोनिवडे व पांगरे बुद्रूक या गावांचा समावेश आहे.दरवर्षी राज्याला उन्हाळी दिवसात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. हजारो गावातील टंचाई व पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट यामुळे शासनही मेटाकुटीला येते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे.पाणीटंचाईच्या तीव्र झळा पोहोचणाऱ्या गावांचा विचार करत, त्यांना भेडसावणारी टंचाई दूर करणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यानुसार, जास्तीत जास्त पाणी गावच्या शिवारात अडवणे, भूगर्भाती पाण्याच्या पातळीत वाढ करणे, राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाण्यासमवेत पिण्याच्या पाण्याच्या वापर क्षमतेत वाढ करणे, बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना पूर्ववत सुरु करणे, विकेंद्रीत पाणीसाठे कमी करणे, पाणी साठवण्याची क्षमता वाढवून नवीन कामे हाती घेणे, निकामी जलस्त्रोताची क्षमता वाढवणे, गाळ काढणे, वृक्षलागवड अशी अनेक कामे केली जाणार आहेत.या अभियानांतर्गत गावांची निवड करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्ह्यात ४५ गावे प्रथम निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी पाच गावांचा समावेश करण्यात आला आहे.राजापूर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पाच निवडण्यात आलेल्या गावांमध्ये मार्च अखेर ज्या गावांना पाण्याची तीव्र टंचाईच्या झळा पोहोचतात व तात्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो अशा ताम्हाणे, मोरोशी, खरवते, गोठणे दोनिवडे व पांगरे बुद्रूक या गावांचा समावेश आहे. आता शासनाच्या निकषांतून या गावांची पाहणी करुन ठरल्यानुसार कामे केली जाणार आहेत. त्यामुळे, या परिसरात भविष्यात गावातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल, अशी आशा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)+++ताम्हाणे, मोरोशी, खरवते, गोठणे दोनिवडे व पांगरे बुद्रूक गावांचा समावेश.राज्यातील टंचाई सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान घेतले हाती.पाणीटंचाईच्या तीव्र झळा पोहोचवणाऱ्या गावांचा विचार करत त्यांना भेडसावणारी टंचाई दूर करण्याचा उद्देश.
पाच गावे ‘जलयुक्त शिवारा’त समाविष्ट
By admin | Published: February 09, 2015 10:52 PM