रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समिती सदस्य विवेक विलास सुर्वे (सदखोल जयगड) यांच्यावर गोळीबार करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे़ पी. झपाटे यांनी दोषी ठरवले़ मंगेश कमलाकर साळवी, सचिन विनायक मोरे व अनिरुद्ध कमलाकर साळवी अशी या तिघांची नावे असून, या तिघांना ५ वर्षे सक्तमजुरी व १ लाख ५ हजार दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली़तीन वर्षांपूर्वी ८ सप्टेंबर २०१३ रोजी गणेशोत्सव काळात जयगड जेटी येथे जयगडचा राजाच्या मंडपाचे काम चालू होते़ सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती सदस्य विवेक सुर्वे व त्याचा मित्र राजेश आरेकर हे तेथे गप्पा मारत होते़ त्यावेळी मंगेश साळवी, सचिन मोरे व अनिरुद्ध साळवी यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून तसेच हत्याराने वार करून विवेक सुर्वे यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता़ यात विवेक सुर्वे गंभीर जखमी झाले होते़ त्यांनी जयगड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती़ त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला होता़ तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवाजी मुळीक या गुन्ह्याचा तपास करत होते़ या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले होते़ सरकारी पक्षाचे पुरावे ग्राह्य मान्य मानून अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे़ पी. झपाटे यांनी मंगेश साळवी व सचिन मोरे याला भा. दं. वि. कलम ३०७ सह ३४ अन्वये ५ वर्ष सक्तमजुरी, १५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा, भा. दं. वि. कलम ३२६ सह ३४ तिघांना ४ वर्ष सक्तमजुरी व प्रत्येक १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने कैद, कलम ३२४ नुसार २ वर्ष सक्तमजुरी व ५ हजार दंड, कलम ३२३ सह ३४ नुसार सहा महिने सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना कैद, हत्यार कायदा कलम ३/२५ (१)(ब) अन्वये मंगेश साळवी याला १ वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना कैद, तर हत्यार कायदा कलम ५/२७ (१) नुसार ३ वर्ष सक्तमजुरी प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले़ (वार्ताहर)
तिघांना पाच वर्षाची सक्तमजुरी
By admin | Published: January 03, 2017 11:40 PM