रत्नागिरी : चिपळूण येथील पूरस्थितीमुळे चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये टोइंग अथवा रिकव्हरी व्हॅन चालकांकडून मोठ्या प्रमाणात भाडे आकारले जात आहे, अशा तक्रारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आल्याने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने टोइंग व्हॅन व रिकव्हरी व्हॅनकरिता भाडे दर निश्चित केले आहेत. यापेक्षा अधिक दर आकारणाऱ्या व्हॅन चालक -मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणचे सचिव तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर यांनी दिली आहे.
चिपळूणमध्ये वाहनांमध्ये अक्षरशः चिखल भरल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. या वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी टोइंग करून ही वाहने कंपनीमध्ये अथवा दुरुस्तीच्या ठिकाणी न्यावी लागत आहेत. काही टोइंग वाहन चालक - मालकांकडून अधिक रक्कम भाडे स्वरूपामध्ये वसूल केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या माध्यमातून टोइंग व रिकव्हरी व्हॅनचे भाडे दर निश्चित करण्यात आले आहेत.
टोइंग व्हॅन क्रेन व रिकव्हरी व्हॅन क्रेन यांचे कमीत कमी भाडे १५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक भाडे हे प्रति किलोमीटरच्या दरानुसार आकारणे बंधनकारक करण्यात आले आहे. टोइंग व्हॅन क्रेनसाठी २२ रुपये प्रति किलोमीटर (येण्या - जाण्यासह) व रिकव्हरी व्हॅन क्रेनसाठी २५ रूपये प्रति किलोमीटर (येण्या - जाण्यासह) असे भाडे दर निश्चित करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या या भाडे दरापेक्षा जादा भाडे दर आकारणी केल्यास अशा वाहनचालक व मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भातील पहिल्या गुन्ह्यासाठी १०,००० व दुसऱ्या गुन्ह्यासाठी २०,००० दंड निश्चित करण्यात आला आहे. या वाहन चालक -मालकांकडून तिसऱ्या वेळी जादा भाडे दर आकारला गेल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.