लोकमत न्यूज नेटवर्कचिपळूण : गेले चार दिवस पडणाºया मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यात नदीनाल्यांना पूर आला आहे. वाशिष्ठी व शीव नदीने धोक्याची पातळी ओलांडली नसली तरीही शहराच्या काही भागात मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पाणी घुसले होते. धामणदेवी रस्त्यावर पेढे हायस्कूलजवळ झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. बहादूरशेख येथील पूल धोकादायक झाल्याने या पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गुहागरकडील भागात जाणारी एस. टी. वाहतूक बायपासमार्गे वळविण्यात आली होती.गेले चार दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात मंगळवारी सकाळपर्यंत २४ तासांत १६०.३३ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. चालू मोसमात १ जूनपासून आजअखेर ३७९२.६५ मि.मी. पाऊस पडला आहे. रात्रभर पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे मध्यरात्रीनंतर शहरातील वाशिष्ठी व शीव नदीला पूर आला. वाशिष्ठी नदीने ४.८० मीटरपर्यंत पाण्याची पातळी गाठली होती. पाच मीटरपर्यंत पाणी वाढल्यास धोक्याचा इशारा देण्यात येतो; परंतु इथपर्यंत पाणी पोहोचले नव्हते. जुन्या बाजार पुलाला पाणी लागले होते.
चिपळूणमध्ये पूरसदृश स्थिती; मध्यरात्री शहरात पाणी घुसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 11:55 PM