आजघडीला आपल्या चिपळूण परिसरात आलेला पूर आणि रायगडमधील दरड कोसळण्याची घटना आणि त्यातून झालेली हानी काळीज हादरवून टाकणारी आहे. अशावेळी शासन यंत्रणा, रेस्क्यू ऑपरेशनसाठी आलेली यंत्रणा, व्यक्तिगत, सामूहिक आणि विविध संस्था यांनी जी अभूतपूर्व सेवा दिली, देत आहेत आणि पुढेही काही दिवस, काही महिने आणि वर्षेही लागतात, देतीलच. कारण हीच मानवीय संस्कृतीचे आरोग्यमयी दर्शन आहे. ही वेळच येऊ नये, पण आता आली. आज सोशल मीडिया सक्रिय असल्यामुळे माणुसकीचं अभूतपूर्व सुसंस्कृत दर्शन होत आहे. ते नक्कीच ‘सामूहिक आरोग्याच्या एकोप्याला’ पोषक आहे. त्याचं अभिनंदन, कौतुक आहेच. पण जी व्यक्ती आणि समूह या दुर्दैवी घटनेची शिकार झालेली आहे, त्यांच्या या दु:खातून सावरण्याच्या मनोबलाला दाद द्यायलाच हवी. ईश्वरीय संकल्पना, मानवीय प्रयत्न आणि निसर्ग साथ मिळून सर्व या संकटातून बाहेर पडोत. सर्वांचीच मनोमनी ईच्छा आहे, प्रार्थना आहे, शुभेच्छा आहेत, सदिच्छा आहेत.
आता पुराचे पाणी ओसरले आहे. मात्र, त्याचा घातक परिपाक चिखलाचे साम्राज्य तिथे वाढले आहे. म्हणून १) जिथे जमिनीचा पृष्ठभाग सहा इंचापेक्षा जास्त चिखलाने माखला आहे, तिथे सावधपणे पाऊल टाकावे. कारण तिथला पृष्ठभाग कसा असेल, याचा अंदाज येत नाही. रेस्क्यू ऑपरेशनमधील तज्ज्ञांच्या किंवा इतर समंजस तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच पुढे जावे. तेही खूप आवश्यक असेल तरच. २) नुकसान झालेल्या इमारतीमध्ये किंवा कमकुवत छपराच्या घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी, कुठला भाग कोसळण्याच्या परिस्थितीत तर नाही ना, याची काळजी घ्यावी. ३) पुराच्या पाण्यातून विषारी जनावरे व सरपटणारे प्राणी (मगर इत्यादी) आपल्या घरात येण्याची शक्यता असते. म्हणून बॅटरीचा किंवा मोबाईलचा दिवा आणि सोबत भरगच्च काठी आधार आणि बचाव यासाठी सोबत असू द्यावी. रेस्क्यू टीमचे लोक ह्या सर्व गोष्टी सांगतात. ४) ज्या खाण्याच्या वस्तूंचा पुराच्या पाण्याशी संपर्क आला असेल त्या खाऊ नयेत, हेही टीमचे लोक सांगतात. ५) अशावेळी पाण्याच्या बाटल्या आणि बिस्कीटाचे पुडे असे सुके पदार्थ जास्त उपयोगी ठरतात. माझ्या माहितीप्रमाणे बरेचसे सेवाभावी समूह, संस्था यांनी या गोष्टींकडे लक्ष पुरविले आहे. ६) साचलेले पाणी पंपाच्या सहाय्याने हळूहळू बाहेर फेकावे. ७) गटारांपासून सावध राहावे. ८) जंतूनाशक फवारणी, साबण आणि नवे कपडे आणि लगेच शिजवता येईल, असे धान्य हेही आवश्यक आहे. सर्वजण अशाप्रकारे मदत करत आहेत. ९) दुर्दैवाने सध्या आपण सर्व कोविड - १९च्या भयावह सावलीत वावरतो आहोत. सॅनिटायझर्स, स्वच्छ टॉवेल्स, हॅण्डग्लोव्हज् याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याही सेवाभावी संस्था पुरवत आहेत. १०) लसीकरणावर जास्त भर द्यावा लागेल. थोडाही संशय किंवा काही लक्षणे दिसलीत तर त्वरित या परिसरात डॉक्टरांच्या टीम्स आरोग्य शासनाने पुरविल्या आहेत. त्यांना त्वरित संपर्क करावा. संसर्ग दोष न लपवता अशा रुग्णांना त्वरित रुग्णालयात हलवावे. ११) दूषित ठिकाणे म्हणून सांडपाणी साचू देऊ नये. १२) साबण, डेटॉल, सॅनिटायझर्स, गमबूट याचा वापर करावा. १३) अफवा पसरवू नये, पसरु नये, याची सर्वांनी काळजी घ्यायलाच हवी. एकमेकांना दुषणे देऊ नयेत. कारण त्याचा परिणाम नकारात्मकरित्या जे या आपत्तीतून प्रत्यक्ष जात आहेत त्यांच्यावर होतो. त्यांचा अगोदर विचार करावा. १४) नुकसानभरपाईसाठी, या आपत्तीतून सावरण्यासाठी शासन यंत्रणेला सर्वप्रकारे मदत करावी. पंचनाम्यात साथ द्यावी. शासनही अशावेळेस गहिवरते. १५) आपत्तीपश्चात तणाव विकृती म्हणजेच नैराश्य, दु:ख, भीती अति काळजीची लक्षणे दिसतात. अशावेळी त्यांच्या सानिध्यातल्या मित्र आणि नातलगांनी मानसिक आधार द्यावा. तो फक्त सकारात्मकच असावा. कारण हीच वेळ असते त्यांना सावरण्याची, धैर्याने उभे करण्याची. यातच सामाजिक आरोग्याची परिपूर्णता आहे. यालाच भावनिक प्रथमोपचार असं म्हणतात.
- डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी