लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : गेले आठवडाभर पाऊस बरसतोय. तीन दिवसांपासून हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. यामुळे प्रशासनाला या सगळ्याची माहिती नव्हतीच असे म्हणणे योग्य ठरणार नाही. त्यातच कोळकेवाडी येथून कोयनेच्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्या पाण्यामुळेच महापुराच्या प्रवाहाचा वेग वाढला आणि अतोनात नुकसान झाले. या परिस्थितीला निव्वळ प्रशासकीय अधिकाऱ्यांची बेफिकिरी कारणीभूत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांसह नागरिकांमधून केला जात आहे.
चिपळूण शहरासह खेर्डीमध्ये पूर इतका वाढला की, सुरुवातीला घरांमध्ये पाणी शिरले. इतकेच नव्हे तर घरांच्या पोटमाळ्यापर्यंत पाणी पोहोचू लागले. यामुळे या घरांमधील नागरिक जीवाच्या आकांताने मदतीसाठी टाहो फोडू लागले. तर दुसरीकडे इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेले. यामुळे नागरिकांनी टेरेस गाठला. या भयाण महापुरामुळे पुरात अडकलेले हजारो नागरिक मदतीसाठी याचना करू लागले. परंतु, सुरुवातीच्या टप्प्यात तितकीशी यंत्रणा नव्हती. काही तास पूरस्थिती स्थिर होती. पुन्हा पाण्याची पातळी वाढली आणि काही भागात सुमारे १५ फुटापर्यंत पुराचे पाणी शिरले. तोपर्यंत मदतीचा कोणताही आधार नव्हता.
जेव्हा पुराचे पाणी ओसरू लागले तेव्हा आमदार शेखर निकम यांच्यासह जिल्हाप्रमुख सचिन कदम, शहरप्रमुख उमेश सकपाळ, नगरसेवक शशिकांत मोदी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, मंडल अधिकारी, तलाठी व पोलीस कर्मचाऱ्यांनी पुरात अडकलेल्यांना मदत देण्यास सुरुवात केली. त्यापाठोपाठ एनआरडीएफसह पुणे येथील आर्मी पथक, कोस्टगार्ड पथक व बोटींना पाचारण केले. त्यांच्या सोबत सुभाष पाकळे फाउंडेशन सावर्डे, हेल्पिंग हॅन्ड, रत्नदुर्ग माऊटेनिअर्स, राजू काकडे हेल्प फाउंडेशन, जिद्दी माऊटेनिअर्स आदींनी बचाव कार्यास सुरुवात केली. तोपर्यंत महापुराचे पाणी बसेचसे कमी झाले होते.
दरवर्षी पावसाळ्यात महापुराच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासन व महसूल विभाग आपत्ती व्यवस्थापन कक्ष व पथक स्थापन करते. त्याशिवाय बाजारपेठेत जागोजागी मोटार बोटी, तसेच बाजारपूल व गोवळकोट येथेही बोट सज्ज ठेवली जाते. मात्र, यावेळी कोणाचा कोणाला थांगपत्ता नव्हता. प्रशासनही आताच्या महापुरापुढे हतबल झाल्याचे चित्र होते. त्यामुळे बाजारपेठेत अडकलेल्या कामगार व नागरिकांना तसेच अतिशय असुरक्षित असलेल्या मजरेकाशी, पेठमाप, गोवळकोट येथील नागरिकांना बाहेर काढणे शक्य झाले नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.