देवरुख : संगमेश्वर तालुक्यामध्ये शुक्रवारी रात्री उशीरापासून पडलेल्या संततधार पावसाने संगमेश्वर तालुक्याला अक्षरश: झोडपून काढले. धोधो पावसामुळे संगमेश्वर बाजारपेठ, आंबेड, कसबा, बुरंबी - लोवले या ठिकाणी पाणी भरल्याने प्रवाशांचा - वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या पावसाचा फटका तालुक्याला चांगलाच बसला असून संगमेश्वर - देवरुख मार्गावर सुमारे ४ तास वाहतूक ठप्प होती.शुक्रवारी दिवसभर सरीवर असलेल्या पावसाने रात्री अकरानंतर धो-धो बरसायला लागलेल्या पावसाने सकाळपर्यंत आपले रौद्ररुप धारण केले. त्यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती.दरम्यान सोनवी नदी दुथडी भरुन वाहताना तिने धोक्याची पातळी ओलांडून नदी काठावर पाणी भरायला लागले होते. बुरंबी गेल्येवाडी जवळील मोरीवर तसेच मयूरबाग आणि लोवले येथील मोरीवर नदीकाठचे पाणी भरल्याने संगमेश्वर - देवरुख मार्गावरील वाहतूक सकाळपासून ठप्प होती. या मार्गावर बुरंबी, गेल्येवाडी, मयुरबाग, लोवले या ठिकाणी ४ फुट उंची इतके पाणी असल्याने वाहतूक साधारणत: सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेदहापर्यंत वाहतूक ठप्प होती.देवरुखहून - संगमेश्वर - मुंबईला जाणाऱ्या बसेस अडीच तीन तास ठप्प झाल्याने परतीच्या प्रवासात असलेल्या मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान, संगमेश्वर बाजारपेठेत पाणी घुसल्याने सकाळी बारा वाजेपर्यंत व्यापारीवर्गाने सतर्कतेची भूमिका स्वीकारली होती. कसबा आंबेड तसेच असुर्डे या ठिकाणी पाणी भरल्याने काही काळ तेथील रहदारी ठप्प झाली होती.संगमेश्वर तालुक्यामध्ये फुणगूस खाडीपट्ट्यालादेखील पावसाने झोडपून काढल्याने फुणगूस बाजारपेठेत देखील पाणी घुसले होते. फुणगूस, परचुरी, कोंड्ये, मांजरे, मेढे डिंगणी, पिंरदवणे या गावातदेखील पाणी घुसल्याने फुणगूस परिसरातील वाहतूक ४ तास ठप्प होती. दरम्यान देवरुखच्या तहसिलदार वैशाली माने यांनी पूरसदृश्य भागाला सकाळी भेट देवून सतर्कतेच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्याला पुराचा फटका
By admin | Published: September 07, 2014 12:27 AM