चिपळूण : चेतना फाउंडेशनच्या माध्यमातून येथील ५०० पूरग्रस्त कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. १००० लोकांची आरोग्य तपासणी करून आरोग्य सुविधा व औषधे वितरित करण्यात आली. याशिवाय काही कुटुंबांना धान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तू वाटण्यात आल्या.
निबंध स्पर्धेत यश
रत्नागिरी : तालुक्यातील कुर्धे जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली. प्रथम गटात अनया अभ्यंकर, साईशा नाईक, राम मिराशी; तर द्वितीय गटात रूपाली शिंदे, निशाद मिराशी, श्रावणी तळेकर विजेते ठरले.
विजेचा लपंडाव
रत्नागिरी : तालुक्यातील गोळप, संतेवाडी येथे विजेचा लपंडाव सातत्याने सुरू असल्याने ग्राहकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. घरगुती विजेची उपकरणे नादुरुस्त होत असल्याने आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. येथे सातत्याने अनियमित वीजपुरवठा सुरू आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
आरोग्य शिबिर
मंडणगड : स्नेहज्योती अंध विद्यालय, भराडी येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नामजोशी मार्ग, पोलीस ठाणे व संवेदना फाउंडेशन यांच्यातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचे रक्तगट तपासून त्यांना अहवाल देण्यात आला. यावेळी विद्यालयाला जीवनावश्यक वस्तू, थर्मामीटर, सॅनिटायझर, चादर, आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
ग्रंथालय ऑनलाईन
खेड : येथील आयसीएस महाविद्यालय ग्रंथालयातर्फे सद्य:स्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मोबाईलद्वारे ऑनलाईन सेवा देण्याच्या उद्देशाने क्यूआर कोड या तंत्रज्ञानाच्या वापराचा प्रारंभ करण्यात आला. प्राचार्य डॉ. गोपीनाथ सारंग यांच्या हस्ते क्यूआर कोडचे उद्घाटन करण्यात आले.