पावस : चिपळूण तालुक्यातील तिवरे फणसवाडी, भिंदवाडी, धनगरवाडी या क्षेत्रात झालेली अतिवृष्टी व भूस्खलनाच्या घटनेमुळे बाधित झालेल्या ५० कुटुंबांना ब्लँकेट, चादरीचे वितरण करण्यात आले. कुर्धे येथील तरुण मित्रमंडळातर्फे साहित्य वाटप करण्यात आले. घरगुती वापरासाठीचे साहित्यही यावेळी देण्यात आले.
धर्माचा उल्लेख नको
रत्नागिरी : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शालेय दाखल्यावर धर्माचा उल्लेख करू नये, अशी मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील पावरा यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना निवेदन दिले आहे.
दुरुस्ती कामाची पाहणी
राजापूर : तालुक्यातील पाचल येथील जिल्हा परिषद गटातील पाचल-तळवडे पूल वाहून गेला होता. या पुलाची तातडीने दुरुस्ती करून पूल लवकरच रहदारीसाठी खुला होणार आहे. या पुलाची पाहणी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, महिला बालकल्याण सभापती भारती सरवणकर, उपजिल्हा महिला संघटक दुर्गा तावडे यांनी केली.
निबंध स्पर्धेचे आयोजन
राजापूर : तालुक्यातील इमेन्स फाऊंडेशनतर्फे वरिष्ठ महाविद्यालय स्तरावर निबंध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. दिनांक २० सप्टेंबरपर्यंत निबंध पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १०००, ८०० व ५०० रुपये रोख, प्रमाणपत्र व प्रोत्साहनपर रोख २५० रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे.
रक्तदान शिबिर
लांजा : प्रोत्साहन युवक संघटना रत्नागिरी आयोजित रक्तदान शिबिरासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संघटनेतर्फे जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी विभागाच्या मार्गदर्शनाखाली पाली येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन रितेश सावंत यांच्याहस्ते झाले. यावेळी सरपंच विठ्ठल सावंत, माजी सरपंच संदीप गराटे, सुधाकर सावंत आदी उपस्थित होते.