बिजघर येथील प्रौढ बेपत्ता : जगबुडी, चोरद, नारिंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; जगबुडी पूल पाण्याखाली खेड : तालुक्यात गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे जगबुडी, चोरद आणि नारिंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. भरणे येथील जगबुडी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावरून दहा वर्षात प्रथमच पाणी गेल्याने महामार्गावरील वाहतूक गुरुवारी रात्री ९ वाजल्यापासून शुक्रवार दुपारपर्यंत बंदच होती. बिजघर - उगवतवाडी येथे राहणारे सुधाकर दत्ताराम भोसले (५०) हे तेथील पुलावरून वाहून गेले असून, त्यांचा अजूनही शोध लागलेला नाही. जगबुडी नदीवरील पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याने खोळंबलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा कमी होऊ लागल्या आहेत. गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा, महाविद्यालये आणि खासगी शिक्षण संस्थांनी आपल्या शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. काही तासातच सायंकाळी ६ वाजल्यापासूनच चोरद नदीला महापूर आला. या मार्गावर पुलावरून पाणी वाहू लागल्याने खेड ते आंबवली दरम्यानची ४२ गावे संपर्कहीन झाली. सायंकाळी ५ वाजल्यापासून सर्व बसेस व इतर वाहनांची वाहतूक बंद झाली. जगबुडी नदीला आलेल्या मोठ्या प्रमाणातील पुरामुळे लगतच्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. पुरामुळे या पुलाचे कठडेदेखील निकामे झाले आहेत. रेलिंग तुटली असून, पुलावरील रस्त्यावर मोठी भेग पडली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड, पोलीस निरीक्षक अशोक जांभळे तसेच तहसीलदार अमोल कदम परिस्थितीवर स्वत: लक्ष ठेवून होते. मदत ग्रुप ही सेवाभावी संस्था आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने पुलाचे तुटलेले रेलिंग तात्पुरते पूर्ववत करण्यात आले. महाड येथील रस्ते महामार्गाचे अधिकाऱ्यांचे एक पथक जगबुडी नदीवरील पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी तातडीने बोलावण्यात आले होते. आॅडिट झाल्यानंतर या पथकाने एकेरी वाहतुकीला परवानगी दिल्याने शुक्रवारी सकाळपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. जगबुडी, नारिंगी आणि चोरद नद्यांना आलेल्या पुराचे पाणी खेड शहरात घुसले होते. शहरातील गांधी चौकात मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने लाखोंची हानी झाली आहे. रात्री ९ वाजल्यापासूनच येथे पाणी भरण्यास सुरुवात झाली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे व नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये- पाटणे यांच्यासह पालिकेचे सर्व कर्मचारी बाजारपेठेत उतरले होते. बाजारपेठेतील सर्वच दुकानांमध्ये चिखलमिश्रीत पाणी घुसल्याने सुमारे ५० लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रकाश कृष्णा तटकरे किराणा दुकान, प्रभाकर कांबळे किराणा दुकान, कल्याणी स्टोअर्स किराणा दुकान, पवार बाजार, हिराचंद बुटाला किराणा दुकान, प्रशांत बेकरी, शशिकांत पाटणे अंडी व्यापारी, तसेच अनेक किरकोळ व्यापाऱ्यांची दुकाने या पाण्याखाली गेली होते. दुकानातील सर्वच माल पाण्याबरोबरच नदीमध्ये वाहून गेला. शुक्रवारी सकाळपासूनच या नुकसानाचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. पंचनामा झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकानातील पाणी व चिखल बाहेर काढण्याचे काम सुरू केले. दुकानातील चिखल बाहेर काढण्यासाठी किमान दोन दिवस लागणार आहेत. आणखी ४ दिवस दुकाने सुरू होणार नसल्याचे दिसत आहे. खेड शहरातील पोत्रिक मोहल्ला, साई मोहल्ला आणि तांबे मोहल्ला येथील अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते. पाणी बाहेर काढण्याचे काम रात्रभर सुरूच ठेवले होते. नगरपालिकेने आपल्या बोटी, दोरखंड तसेच यांत्रिकी बोट सज्ज ठेवली होती. (प्रतिनिधी) नुकसानाचा आकडा चार कोटीवर जाण्याची चिन्ह खेड शहरातील १२९ दुकानांतील मालाचे २ कोटी ८१ लाख १ हजार ८०० रूपये नुकसान झाले आहे. शहरातील मटण मार्केट परिसरातील शेळ्या व मेंढ्या पुरामध्ये वाहून गेल्या. तसेच तालुक्यातील ३७ शेळ््या दगावल्या असून, त्यांचे २ लाख ४ हजार रूपये नुकसान झाले आहे. १ म्हैस दगावली असून, ५० हजार रूपये, १ गोठा कोसळला असून, ४ हजार रूपये, १ बैल दगावला असून ३३ हजार रूपये, १ ओमनी कार वाहून गेली असून, तिचे २ लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच १३ घरातील अन्नधान्य वाहून गेले असून, त्यांचे ३ लाख ९३ हजार ३०० रूपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय ३८ घरांची किरकोळ पडझड झाली असून, त्यांचे १ लाख २८ हजार रूपयांचे नुकसान झाले. एका आॅईल कंपनीचेही नुकसान झाले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्यानुसार २ कोटी ८१ लाख १ हजार ८०० रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद खेड तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. नुकसानाचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. तळे-रसाळगड मार्गावरील पुलाचा भाग कोसळला तळे - रसाळगड या मार्गावरील पुलाचा एका बाजूकडील मोठा भराव कोसळल्याने ७ गावे आणि काही वाड्यांचा संपर्क तुटला आहे, तर तळे गावातील कांगणेवाडी येथील रस्ता पुरामध्ये वाहून गेल्यामुळे ११ गावातील १०० ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे़ आपत्ती व्यवस्थापनांतर्गत उपलब्ध झालेला दिवा खेडमधील आपत्तीप्रसंगी वापरण्यात आला होता. यावेळी या दिव्याची चांगली मदत झाल्याची माहिती तहसीलदार अमोल कदम यांनी दिली. हा एक फुग्यासारखा दिवा असून, तो दीर्घकाळ टिकतो. या दिव्याचा वापर गुरूवारच्या आपत्तीप्रसंगी खेड शहरामध्ये प्रथमच करण्यात आला. हाच दिवा जगबुडी नदीवरील पुलावर वाहनचालकांना आणि मदतकार्यासाठी आलेल्या
खेड तालुक्याला पुराचा वेढा
By admin | Published: September 23, 2016 11:26 PM