राजापूर : सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी दुपारपासून पुन्हा जोर धरल्याने राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर सायंकाळपर्यंत कमी न झाल्याने व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.
शनिवारी (दि, १२) सायंकाळपासून राजापूर तालुक्यात पावसाने जोर धरला होता. त्यामुळे काही ठिकाणी किरकोळ पडझडीच्या घटनाही घडल्या होत्या. तालुक्यातील दोनिवडे येथे मोरीवर पाणी आल्याने रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता बंद होऊन वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर रविवार (दि. १३) पासून पुन्हा पाऊस पडत होता. सोमवारी (दि. १४) पुन्हा पावसाने जोर धरल्याने तालुक्यातील सर्व नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. कोदवली व अर्जुना नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली होती. मात्र शहराला पुराचा धोका नव्हता. मात्र बुधवारी दुपारपासून पुन्हा पाऊस कोसळू लागल्याने दोन्ही नद्यांचे पाणी वाढले आहे.
नदीचे पाणी जवाहर चौकाकडे सरकत असल्याने बाजारपेठेतील रहिवासी व व्यापाऱ्यांनी आपले सामान सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राजापूर शहराकडून शीळकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे.