रत्नागिरी : उत्कर्ष कुणबी संस्था (रजि.) साखरपा दाभोळे पंचक्रोशी, रिझर्व्ह बँक वर्कर्स युनियन तसेच मालाडचे नगरसेवक आत्माराम चाचे यांच्यावतीने साखरपा पंचक्रोशीतील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू तसेच भांडी, छत्री व इतर वस्तू आदींचे वाटप करण्यात आले. प्रत्येकाचे स्वतंत्र कीट प्रत्येक पूरग्रस्ताला देऊन कार्यक्रम संयुक्तरित्या राबविण्यात आला.
जुलै २०२१ मध्ये कोकणात पावसाची अतिवृष्टी होऊन अतिभयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली. महापुरामुळे वित्तहानी होऊन अनेक कुटुंबे उदध्वस्त झाली. घरे, गोठे जमीनदोस्त झाले, भातशेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यांचे संसार उघड्यावर पडले. होत्याचं नव्हतं झालं. अशा कठीण परिस्थितीत त्यांना मदतीचा हात म्हणून देवडे, किरबेट, भडकंबा, मुर्शी, दख्खन, ओझरे बुद्रुक, खडीकोळवण आणि दाभोळे या गावातील पूरग्रस्तांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी रिझर्व्ह बँक वर्कर्स युनियनचे चीफ सेक्रेटरी भास्कर येरवणकर व त्यांचे सहकारी तसेच नगरसेवक आत्माराम चाचे, उत्कर्ष कुणबी संस्थेचे अध्यक्ष रमेश पितळे, सचिव महेंद्र मोरे, संस्थेचे पदाधिकारी दयानंद चिंचवलकर, कोंडगावचे उपसरपंच प्रवीण जोयशी, प्रमोद चाचे, मुर्शीचे सरपंच मंगेश दळवी, हरिभाई धुमक, दीपक बेर्डे, खडिकोळवणचे सरपंच संतोष घोलम, पोलीसपाटील अनिल घोलम तसेच अनेक स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
उत्कर्ष कुणबी संस्थेतर्फे पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्याला समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल संस्थेतर्फे आभार मानण्यात आले.