- राजापूर तालुक्यात १९६ मिलीमीटर पावसाची नोंद
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : गेले चार दिवसांपासून शहर आणि तालुका परिसरात झालेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना बुधवारी पूर आला. या दोन्ही नद्यांनी मध्यरात्रीनंतर पुराची पातळी ओलांडली असून, पुराच्या पाण्याने शहर बाजारपेठेला वेढा दिला. जवाहर चौकात ध्वजस्तंभाला वेढा देत टिळेकर दुकानापर्यंत पुराच्या पाण्याने धडक दिली. तर शहर बाजारपेठेतही पाणी शिरले हाेते. त्यामुळे शिवाजीपथ, बंदरधक्का, मुन्शीनाका, वरचीपेठ, कोंंढेतड भागातील रस्ते पाण्याखाली गेले. मात्र, गुरुवारी सकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरले असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
राजापूर तालुक्यात बुधवारी १९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राजापूर शहर आणि तालुका परिसरात सोमवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन राजापुरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. बुधवारी सायंकाळी कोदवली व अर्जुना या दोन्ही नद्यांनी आपली इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे राजापूर नगरपरिषदेने सायंकाळी ६ वाजता सायरन वाजवून धोक्याचा इशारा दिला होता. त्यामुळे व्यापारी व नागरिक सतर्क झाले होते. मात्र, मध्यरात्री पावसाने पुन्हा जोर धरला. त्यामुळे मध्यरात्रीनंतर पुराच्या पाण्याने शहर बाजारपेठेत प्रवेश करत शहरातील जवाहर चौकाला वेढा घातला. त्यामुळे शहर बाजारपेठेत पूरपरिस्थिती निर्माण झाली.
पुराचे पाणी बाजारपेठेत शिरू लागताच जवाहर चौक व परिसरातील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील सामान सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यामुळे कोणाचेही आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त नाही. पुराच्या पाण्यामुळे जवाहर चौक परिसर, मासळी मार्केट परिसर पाण्याखाली गेला. चिंचबांध रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता बंद झाला होता. तर शिवाजीपथ व गुजराळी रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर वासुकाका जोशी पुलावर पुराचे पाणी आल्याने आंबेवाडी मार्ग बंद झाला तर शीळ गोठणे दोनिवडे मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
गुरुवारी सकाळी मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने शहर बाजारपेठेतील पाणी ओसरू लागल्याने जनजीवन सुरळीत सुरू झाले. जवाहर चौकातील पाणी ओसरल्याने या भागात वर्दळ पूर्ववत सुरू झाली. शहरात पुराचे पाणी शिरल्याने मध्यरात्रीच नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी पुराची पाहणी केली. तर सकाळीच तहसीलदार प्रतिभा वराळे, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी जवाहर चौक परिसराला भेट देऊन पाहणी केली़