रत्नागिरी : लग्नसराई व रमजान ईदनिमित्त फुलांचा खप मोठ्या प्रमाणात होतो. मात्र सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊन सुरू असल्याने फूल व्यवसायावर परिणाम झाला आहे. फूल व्यवसाय आर्थिक संकटात आला असून लॉकडाऊनमुळे फुलांचा बाजारच सुकला आहे.
लग्नानिमित्त हार, तुरे, वेण्या, गजरे, पट्टा; शिवाय वाहन सजविण्यासाठी लागणारी फुले तसेच मंडप किंवा स्टेज सजावटीसाठी जरबेरा, ट्यूलिप, गुलाबासारख्या फुलांना मागणी असते. मात्र लग्नासाठी २५ लोकांची अट असल्याने अन्य खर्चाला फाटा देण्यात येत आहे. हार, वेण्या, तुरे यांसाठी मागणी मर्यादित होत आहे.
रमजान ईदनिमित्त छोटे रोजेदार यांचा सत्कार करण्यात येतो. मुलींना गजरे, फुलांचा पट्टा, तर मुलांना हार, तुरे घालून सजविले जाते. मात्र यावर्षी बाजारात फुलेच नसल्यामुळे मागणी असूनही व्यवसायावर परिणाम झाला आहे.
रत्नागिरीत येणारी फुले नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव येथून एस.टी.तून येतात. लॉकडाऊनमुळे फुलांची आवक घटली आहे. खासगी भाजीविक्रीच्या गाड्यातून फुले पाठविण्यात येत असतात. तरी त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यात फूल व्यवसाय संकटात आला आहे.
झेंडू, लिलीचे जिल्ह्यातील काही शेतकरी उत्पन्न घेत असल्याने विक्रीसाठी उपलब्ध होतात. मात्र शेवंती, झेंडू, गुलाब, जरबेरा, मोगरा ही फुले पुणे, कोल्हापूर, बेळगावहून येतात. जरबेरा, तसेच बुके व सजावटीसाठी लागणारी फुले मात्र मुंबई, पुण्यातून येतात. तयार गजरे बेळगाव येथून विक्रीला येतात.
कोरोनामुळे कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे राजकीय, सांस्कृतिक तसेच अन्य छोट्या-मोठ्या कार्यक़्रमांसाठी भेटवस्तूंसह बुके किंवा फुले देण्यात येतात. मात्र कार्यक्रम नसल्याने बुके व्यवसायावर परिणाम झाला आहे.
-------------------------------
जिल्ह्यातील फूल व्यावसायिक ३५०
दिवसाचा व्यवसाय : ८ कोटी ७ लाख ५० हजार
झेंडू - १०० ते १५० रुपये किलो
गुलाब १५ ते २० रुपये किलो
जरबेरा १२ ते १५ रुपये नग
गजरा बंडल १२०० ते १४०० किलो
लिली २० ते २५ रुपये जुडी
-----------------------------
फुलांची उपलब्धता कमी आहे. शिवाय मागणीही घटली आहे. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या फुलांवर व्यवसाय करावा लागत आहे. देवपूजेसाठी सुटी फुले व हार यांना मागणी होते. लग्नसोहळ्यासाठीही मागणी घटली आहे. परिणामी हार, बुके, तुरे तयार करणाऱ्या कामगारांना कामच नाही. गतवर्षीपासून व्यवसाय संकटात आला आहे.
- संतोष, फूलविक्रेता
लग्न, वाढदिवस, मुंज समारंभानिमित्त फुले, हार, गजरे तसेच स्टेज, कार सजावटीबरोबर बुकेसाठी विशेष मागणी होते. लग्नसराई व रमजान ईदनिमित्त फुलांचा चांगला व्यवसाय होतो. मात्र मागणीही घटली आहे. शिवाय लॉकडाऊन असल्याने व्यवसाय संकटात आला आहे.
- राजा, छोटे फूलविक्रेते