सुट्टीदिवशीही काम सुरू
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती अत्यावश्यक सेवेमध्ये असल्यामुळे बाजार समितीचे काम कायम सुरू आहे. लिलाव, शेतमाल तारण योजनेसह शासकीय कार्यालयीन कामकाज नियमित सुरू आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये, यासाठी सुट्टीदिवशी कामकाज करण्यात येत आहे.
ऑनलाईन लसीकरणाचा फटका
देवरूख: जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. प्रत्येक आरोग्य केंद्राला १५० डोस उपलब्ध झाले असून ऑनलाईन नोंदणी असल्याने आरोग्य केंद्राची यादी जाहीर झाली आहे.
भूमिगत वाहिन्यांचे काम सुरू
रत्नागिरी : शहरासह आसपासच्या गावात भूमिगत वाहिन्यांचे काम सुरू आहे. विजेच्या भूमिगत वाहिन्यांसह, गॅस वाहिनीसह, पाण्याच्या वाहिन्यांचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे रस्त्याची साईडपट्टी खोदण्यात येत असल्यामुळे रस्त्यावर मातीचे ढिगारे वाढले आहेत.
अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात
रत्नागिरी : गेले दोन दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली तर काही ठिकाणी मात्र पावसाने नुसतीच हजेरी लावली. यावर्षी आधीच आंबा उत्पादन कमी असताना, अवकाळी पावसामुळे आंब्याचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.