रत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट येण्याची तीव्र शक्यता आहे. कोरोना काय आहे, हे वर्षभरात साऱ्यांनाच कळलं आहे. त्यामुळे निष्काळजीपणे कोरोनाला सामोरे जाण्यापेक्षा काळजी घेऊन सामोरे जाणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन करायचं की नाही, हा निर्णय जनतेवर सोपवला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन होऊ नये, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर नाईलाजाने जिल्हा प्रशासनाला संचारबंदी लागू करावी लागेल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले आदी अधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक घेतल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
आतापर्यंत नगरपालिका, महसूल यांच्याकडे मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार दिले होते. आता त्यात पोलिसांचाही समावेश असून मास्क न लावणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे. मागच्या वेळेसारखे निर्बंध लावायचे असतील तर तो निर्णय जिल्हाधिकारी यांनी घ्यावा, असे ते म्हणाले.जे सार्वजनिक कार्यक्रम विनापरवाना आयोजित केले जातील, त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शक्यतो रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुणी बाहेर पडू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोकणातील शिमगा हा सण महत्त्वाचा आहे, त्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे हा सणही साधेपणाने साजरा केला जावा, असे ते म्हणाले.
येत्या २ मार्च रोजी अंगारकी चतुर्थी आहे. हा दिवसही साधेपणाने साजरा करण्याबाबत आपण तसेच जिल्हाधिकारी गणपतीपुळे येथील देवस्थानच्या विश्वस्तांशी बोलणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.ते म्हणाले की, सुरुवातीला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिले १५ दिवस पोलिसांना जी कारवाई करावी लागली ती वेळ आणू नका. त्यासाठी येत्या १५ दिवसांच्या कालावधीतील महोत्सव, सण तसेच क्रिकेट, खोखो आदी खेळ, स्नेहसंमेलन काही दिवसांसाठी थांबवावीत, असे आवाहन त्यांनी केले.दररोज घेणार आढावाजिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे सर्व रुग्ण येतील, त्यांच्या नातेवाईकांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे छोट्या-छोट्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांचीही स्वॅब चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये यांचा आढावा दररोज अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, तर प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी घेतील....तर पर्यटकांनाही बंदीरत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांचे पालन केले नाही, तर पर्यटकांनाही जिल्ह्यात येणे बंद केले जाईल. याबाबतही कडक निर्बंध लादण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. लोकांनी ऐकलं नाही, तर संचारबंदी लागू करावी लागेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. लोकांनी या साऱ्याची स्वत:हून दखल घेतली नाही तर प्रशासनाला कडक कारवाई करावी लागेल, असेही ते म्हणाले.