रत्नागिरी : राज्यभरातच ई-पाॅस मशीनच्या तक्रारी वाढल्या असल्याने वितरण व्यवस्था ठप्प झाली आहे. डिसेंबर महिन्याची दहा तारीख उलटली तरीही रेशनधारकांना अद्याप धान्य मिळालेले नाही. धान्य घेण्यासाठी लाभार्थी रेशन दुकानात येतात. परंतु मशीन चालत नसल्याने त्यांचा रोष दुकानदारांना सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार सांगून देखील मशीनची समस्या जैसे थे च असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे.धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी यासाठी शासनाच्या पुरवठा विभागाकडून आता रेशन दुकानात ई-पाॅस मशीन बसविण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचा थंब लागल्यानंतरच धान्य दिले जाते. मध्यंतरी ग्रामीण भागात या यंत्राला कनेक्टिव्हिटीची समस्या सतावत होती. त्याचबरोबर ई-पाॅस मशीनमध्ये ही बिघाड असल्याने धान्य वितरणात अडचण येऊ लागली आहे.त्यामुळे लाभार्थ्यांना धान्याचा वेळेवर लाभ मिळत नाही. पाॅस मशीन मधल्या बिघाडामुळे खेडोपाडीच्या लाभार्थ्यांना तासनतास रेशन दुकानात बसून रहावे लागत आहे. त्यातच धान्य वाटप वेळेवर झाले नाही पुरवठा विभागाकडून दुकानदारांनाही वारंवार ताकीद देण्यात येते. त्यामुळे या समस्येने दुकानदारही त्रस्त झाले आहेत.
योजना चांगली असली तरी त्याच्या अंमलबजावणीत त्रुटी असल्याने त्याचा फटका रत्नागिरीसह राज्यातील लाभार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे शासनाने पाॅस मशीनची समस्या दूर करावी, अशी मागणी लाभार्थी करत आहेत.
शासनाने वितरण व्यवस्था पारदर्शी व्हावी, यासाठी सर्व रेशनदुकानांमध्ये पाॅस मशीन बसविले आहे. मात्र, या मशीनच चालत नाहीत. त्यामुळे राज्यातच वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. धान्य वितरणाला विलंब झाला तर त्याला मुदतवाढ मिळत नाही. धान्य वेळेवर पोहोच न झाल्यास लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येईल. तरी याची दखल शासनाने घ्यावी. - गणपत डोळसे पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रेशन दुकानदार फेडरेशन