चिपळूण : तालुक्यातील मुंढे गावी फायबरच्या ढोलांना मागणी वाढली आहे. वापरासाठी सोयीचे व वजनाने हलके असलेल्या फायबरच्या ढोलांचा आवाज सध्या ग्रामीण भागात घुमत आहे. पूर्वी लाकडाच्या ओंडक्यापासून बनविलेले ढोल मोठ्या प्रमाणावर वापरले जायचे. त्या काळी अन्य प्रकारचे ढोल उपलब्ध नसल्याने लोकांना लाकडी ढोलांचाच आधार घ्यावा लागत असे. काळ बदलला, लाकूडतोडीवर निर्बंध आले. अनेक ठिकाणी लाकूड मिळेनासे झाल्याने लाकडाची जागा सिमेंटने किंवा फायबरने घेतली. त्यामुळे अत्याधुनिक अशा अनेक वस्तू या फायबरमध्ये मिळू लागल्या. ग्रामीण भागात होळी किंवा इतरवेळी वाजविण्यात येणारे ढोल आता फायबरमध्ये बनविले जात आहेत. हे ढोल वजनाला हलके व वाहतुकीला सोयीचे असल्याने वर्षानुवर्ष टिकतात. लाकडाच्या ढोलाची किंमत आणि फायबरच्या ढोलाची किंमत साधारणत: सारखी असल्याने या ढोलाला अधिक पसंती आहे. मुंढे येथे ७ हजार ५०० रुपये दराने हे ढोल विकत मिळतात. या ढोलांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. या ढोलांचा आवाजही सुमधूर असतो. तयार ढोल कमी दराने मिळत असल्याने ग्राहकांची पसंती या ढोलांना अधिक आहे. फायबरच्या ढोलांबरोबरच मुंढे येथे १७ हजार रुपयांमध्ये फायबरचे शौचालयही उपलब्ध आहे. फायबरची टाकी व फायबरची शेड अतिशय शिस्तबध्द पद्धतीने बनविलेली असल्याने निर्मल ग्राम अभियानासाठी ग्रामीण भागात याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. तयार शौचालय मिळत असल्याने ग्रामस्थांचाही वेळ आणि पैसा वाचला आहे. वाळूचा तुटवडा, सिमेंटचे वाढलेले दर व जांभ्याची महागाई यामुळे शौचालय बांधणे अडचणीचे होऊन बसले आहे. त्यामुळे निर्मल ग्रामला याचा फटका बसत होता. शासनाकडून मिळणारे अनुदानही तुटपुंजे होते. आता फायबरच्या शौचालयामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
फायबरच्या ढोलांचा घुमतोय आवाज
By admin | Published: April 20, 2016 10:36 PM