रत्नागिरी : हवाईमार्गे अमेरिकेच्या बाजारपेठेत पाेहाेचलेला भारतीय आंबा आता समुद्रामार्गेही तेथे पाेहाेचणार आहे. भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप ॲग्रो ॲनिमल्स प्रा. लि., यांच्या संयुक्त प्रयत्नाने भारतीय आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेला रविवारी (५ जून) रवाना केला आहे. तब्बल १६,५६० किलाे आंबा अमेरिकेत पाठविण्यात आला आहे. भारतीय आंब्याच्या निर्यातीमधील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांनी सांगितले.
मुंबईतील वाशी येथील विक्री सुविधा केंद्र येथून अमेरिकेला देशातून प्रथमच आंब्याची समुद्रमार्गे निर्यात करण्यात आली. यावेळी भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरच्या बायोसायन्स विभागाचे संचालक डॉ. टी. के. घंटी उपस्थित होते. कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार म्हणाले की, आंब्याच्या समुद्रमार्गे निर्यातीमुळे आंब्याचा वाहतूक खर्च दहा टक्क्यांवर येणार असून, त्यामुळे अमेरिकेतील बाजारपेठेत भारतीय आंबा स्पर्धात्मकरित्या उतरून इतर देशांतील आंब्याशी स्पर्धा करू शकेल, तसेच समद्रामार्गे निर्यातीमुळे आंबा दीड महिन्याच्या जादा कालावधीसाठी तेथील बाजारपेठेत राहील.डॉ. टी. के. घंटी यांनी कृषी मालाची निर्यात आणि कृषी मालाची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर कृषी पणन मंडळाला सर्वतोपरी मदत करेल. संशोधनात आम्ही मोठे काम करीत आहोत. आमचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी पणन मंडळाने काम करावे, असे आवाहन केले. कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांनी आंबा निर्यातीसाठी केलेल्या प्रक्रिया, तसेच कामकाजाबाबतची माहिती दिली.
यावेळी अमेरिकेचे क्वारंटाईन विभागाचे इन्स्पेक्टर डॉ. कॅथरीन फिडलर, एन.पी.पी.ओ.चे उपसंचालक डॉ. झेड. ए. अन्सारी, अपेडाचे उपसरव्यवस्थापक रवींद्र सानप, ॲग्रो ॲनिमल्सचे संचालक शिवाजी सानप, वाफाचे अध्यक्ष अण्णा शेजवळ, ईक्राम हुसेन, मर्क्स कंपनीचे व्यवस्थापक रवींद्रनाथन् उपस्थित होते.
कंटेनरमध्ये १६,५६० किलो आंबाआंबा कंटेनर थेट अमेरिकेत पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. आंब्यावर सर्व प्रकारच्या प्रक्रिया करून टप्प्या-टप्याने आंबा शीतगृहामध्ये साठविण्यात आला होता. एकूण ५५२० बॉक्सेसमधून १६,५६० किलो आंबा कंटेनरद्वारे पाठविण्यात आला आहे. हा कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, न्हावाशेवा बंदरातून रवाना केला असून, अमेरिकेत नेवार्क या न्यूजर्सी शहराजवळील बंदरात पोहोचणार आहे.