रत्नागिरी : येथील देव घैसास किर वरिष्ठ महाविद्यालयात भूगोल आणि विज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने खारफुटी वनसंवर्धन दिन साजरा करण्यात आला. वनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्रा. विनय कलमकर यांनी खारफुटी वनांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाला संस्था पदाधिकारी तसेच प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, ऋतुजा भोवड आदी उपस्थित होते.
लोकमान्य टिळक जयंती
देवरुख : येथील आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पर्यवेक्षक एम. आर. लुंगसे, राष्ट्रीय सेवायोजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सानिका भालेकर, ग्रंथपाल सुभाष मायंगडे, कार्यालय अधीक्षक नीता भागवत आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांची समाजसेवा
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील उद्योजक विजय कुवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील ग्रामस्थांनी चिपळूण येथील पूरग्रस्त भागात जाऊन स्वच्छता मोहीम राबविली. सुमारे १५० ग्रामस्थांचा यात सहभाग होता. या ग्रामस्थांनी अनेक भागात जाऊन येथील चिखल साफ केला.
वीजवाहिन्यांना धोका
गुहागर : तालुक्यातील अडूर येथील रहिवासी सरस्वती गडदे यांच्या घराच्या छपराला चिकटलेल्या वीजवाहिन्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. गेली दोन वर्षे याबाबत महावितरणकडे सातत्याने तक्रार करण्यात येत आहे. परंतु कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. घराशेजारी रस्त्यालगत असलेला विद्युत खांबही धोकादायक झाला आहे.
वाहतूक सुरू
सावर्डे : चिपळूण तालुक्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कळकवणे, आकले, तिवरे रस्त्यावर पूल वाहून गेले आहेत. तसेच दरड कोसळल्याने वाहतूकही बंद झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूल होईपर्यंत पिंपळी नाका ते पेढांबे नाका, खडपोली व आकले पर्यायी मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.
पूरग्रस्तांना मदत
दापोली : शिवसेना शाखा कोकंबाआळी व मरिआई मित्र मंडळ यांच्यामार्फत चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे करण्यात आला आहे. दिलेल्या मदतीत पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे पुडे, दूध पावडर, फरसाण, चिवडा पॅकेट, कपडे तसेच चादर आदींचा समावेश आहे.
भातलागवडीचे प्रात्यक्षिक
देवरुख : संगमेश्वर तालुका कृषी विभागातर्फे तेºये गावातील शेतकरी विनोद मोहिते यांच्या प्रक्षेत्रावर चारसूत्री भातलागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी युरिया बिक्रेड, हिरवळीच्या खताचा वापर, भात पीक विमा, फळबाग लागवड आदी योजना, खतांचे व्यवस्थापन, खत बचत मोहीम आदींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
रक्तदान प्रतिसादात
साखरपा : देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयातील ऐच्छिक सल्ला व तपासणी केंद्र तसेच मुस्लिम समाजबांधव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. देवरुख जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये हे शिबिर आयोजित केले होते. उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. संदीप माने यांच्याहस्ते झाले. या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.
भाजीपाला महागला
मंडणगड : गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा जोर होता. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या भाजीपाल्याची आवक पूर्णत: घटली आहे. सध्या ठराविक भाजीपालाच बाजारपेठेत उपलब्ध आहे. भाजीपाला भिजल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या भाजीपाल्याचे दर भरमसाठ वाढले आहेत.
उद्योग बंद
आवाशी : अतिवृष्टी आणि पुरामुळे लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील बहुतांश उद्योग अतिवृष्टी व पुरामुळे बंद झाले आहेत. या वसाहतीतील ९० टक्के कर्मचारी चिपळूण शहरातील पुरात अडकल्याने कंपनीत जाऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे सध्या चिपळुणात स्वच्छता मोहिमेला वेग आला आहे. त्यामुळे हे कर्मचारी घराच्या स्वच्छतेत गुंतले आहेत.