रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह रविवारी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. उद्योजक किरण सामंत यांनी नागले व त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित, महिला आघाडी प्रमुख शिल्पा सुर्वे, माजी नगरसेवक रोशन फाळके, तालुका प्रमुख बाबू म्हाप यावेळी उपस्थित होते.
शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दीपक नागले यांनी अचानक केलेल्या प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्यासह मोगर ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा थारळी, उपसरपंच राजाराम नावणेकर, सदस्य तसेच माजी सरपंच वामन साखरकर, शाखाप्रमुख अनिल बावकर, मोगरे विकास मंडळ (मुंबई) चे पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. कोंडसर बुद्रूक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शाखाप्रमुख रत्नदीप वारीक, विशाल नांदगावकर, राजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास वारीक यांच्यासह गटप्रमुख, महिला संघटक यांनी बहुसंख्येने शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला आहे.
त्याचप्रमाणे कशेळी येथील कुणबी बॅंकेचे संचालक विद्याधर गोठणकर, कुणबी समाज सेवा मंडळाचे संदीप राडये, ग्रामपंचायत सदस्य अजय सुतार. स्वप्निल माळी, दिलीप मेस्त्री, विक्रांत राडये, दत्ताराम ठुकरूल, आराध्य हळदकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. उद्योजक किरण सामंत यांनी नागले यांच्या सर्व समर्थकांचे स्वागत केले.
शिक्षण व आरोग्य महत्वाची कारणे आहेत. विकास महत्वाचा मुद्दा असून राजापूर ग्रामीण भागातील विकास महत्वाचा आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी विकास हा मुद्दा घेत ज्या प्रमाणे विकासाची घोडदौड करत आहेत. त्याच विकासकामाचा मुद्दा आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यासाठी आम्ही प्रेरित होवून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे माजी सभापती दीपक नागले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. किरण सामंत यांना भावी खासदार म्हणून आम्ही पाहतो. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला आवडेल अशी विश्वासही नागले यांनी व्यक्त केला.
दीड वर्षानंतर शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नागले यांनी पक्ष प्रवेशासाठी उशीर झाला हे खरे आहे. परंतु राजापूर तालुक्यातील, ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. लवकरच आणखी काही कार्यकर्तेही प्रवेश करतील असेही यावेळी सांगितले.