ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रत्नागिरीतील बारसू गावाच्या दौऱ्यावर आहेत. नुकतेच ते राजापूरमधील साखरीत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे आज बारसूमधील रिफायनरी विरोधकांची भेट घेणार आहेत. रिफायनरीच्या मुद्द्यावर आजवर जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. त्या आरोपांना उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यात उत्तर देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे दोन ठिकाणी विरोधकांना भेटणार आहेत. सोलगाव फाट्यावर देवाचे गोठणे, गोवीळ आणि गिरमादेवी कोंड या ठिकाणी बारसू आणि परिसरातील विरोधकांसोबत उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास गिरमादेवी कोंड इथे उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलन चार पाच दिवस स्थगित होते. मात्र ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त कालपासूनच बारसूच्या सड्यावर ग्रामस्थ जमायला सुरुवात झाली आहे. ठाकरे शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पुन्हा नव्याने आंदोलन सुरु होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर दुसरीकडे प्रकल्प समर्थकही राजापुरात एकवटणार आहेत. ठाकरे प्रकल्पविरोधकांना भेटण्यासाठी येत असले तरी त्यांची भेट घेण्याची व आपल्या भावना त्यांच्यासमोर मांडण्याची तयारी प्रकल्प समर्थकांनी केली आहे.
सडा पुन्हा गजबजला
गेले काही दिवस बारसू प्रकल्प सड्यावरील आंदोलन स्थगित करण्यात आले होते. शुक्रवारी सड्यावर पुन्हा आंदोलक जमू लागले होते. त्यामुळे नव्याने आंदोलन सुरु होण्याची शक्यता वाढली आहे.