रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर राज्य मागासवर्गीय आयाेगाने अहवाल दिल्यानंतर तिल्लाेरी कुणबी असे लावण्यात येणार आहे. याबाबत मागच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा, असे सांगितले हाेते. परंतु, ते काही हाेऊ शकले नाहीत, असा टाेला उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.मंत्री सामंत म्हणाले की, १९६१ साली कुणबी जातीसमाेरील ‘तिल्लाेरी’ हा शब्द काढण्यात आला हाेता. त्यासाठी लाेकनेते श्यामराव पेजे यांनी अथक प्रयत्न केले हाेते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मागासवर्गीय आयाेगाला विनंती केली. त्यानंतर आयाेगाने जाे अहवाल दिला, त्यानंतर कुणबी बांधवांची ही ऐतिहासिक मागणी मान्य झाली. कुणबी जातीसमाेर ‘तिल्लाेरी कुणबी’ असे लावले जाणार आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.लाडकी बहीण याेजनेंतर्गत ज्या महिलांच्या खात्यावर अजूनही पैसे जमा झालेले नाहीत, त्यांच्या खात्यावर २९ किंवा ३० तारखेला पैसे जमा हाेतील. त्यांच्या खात्यावर ४,५०० रुपये जमा हाेतील. ज्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले आहेत, त्यांच्या खात्यावर १५०० रुपये जमा हाेतील, असेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री युवा कार्यशाळा याेजनेंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये ८४७ जणांना सहा महिन्यांसाठी महिना १० हजार रुपये मानधनावर भरण्यात यशस्वी झालाे आहाेत. याेजनादूत याेजनाही आपण राबवत असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.
बाळ माने माझे सहकारीमाजी आमदार बाळ माने आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत विचारले असता, मंत्री सामंत म्हणाले की, त्यांच्या वैयक्तिक राजकीय प्रवासाबद्दल मला बाेलण्याचा काही अधिकार नाही. त्यांना लाेकशाहीमध्ये काेणालाही भेटण्याचा अधिकार आहे, सणासुदीच्या नावाने भेटण्याचा अधिकार आहे. ते पक्षप्रवेशासाठीच गेले आहेत, असे म्हणणे उचित वाटत नाही. तेदेखील माझे सहकारी आहेत, भाजपचे चांगले काम करत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकाही समजून घेण्याची गरज आहे. उद्या मी कामानिमित्त काेणाला भेटलाे तर मी पक्षप्रवेश करत आहे, असे हाेत नाही.