रत्नागिरी : पक्षप्रमुखांना अवमानित करुन मुख्यमंत्री पदावरुन पायउतार करणारा शिवसैनिक कसा असू शकतो, असा प्रश्न करत माजी खासदार अनंत गीते यांनी सध्याच्या राजकारणाबाबत आपले मत व्यक्त केले. नारायण राणे, छगन भुजबळ यांचे बंड आणि आताचे बंड यात फरक आहे. तेव्हाच्या बंडाला काँग्रेसचे सहकार्य होते. पण ते काँग्रेस पुरस्कृत बंड नव्हते. आताचे बंड भाजप पुरस्कृत आहे, असा आरोपही त्यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केला.रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी गीते यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेना कोणाची यावरुन आता वाद सुरू आहे. त्यावर त्यांनी आपले मत विस्तारपूर्वक मांडले. निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना सक्रिय राजकारणात हळूहळू उतरली. सुरुवातीला मुंबई महानगर पालिका, मग ठाणे महानगर पालिकेत शिवसेनेने स्थान मिळवले. ज्यावेळी टी. एन. सेशन देशाच्या निवडणूक आयोगाचे प्रमुख झाले, त्यावेळी त्यांनी निवडणूक नियमावली कडक राबवण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी नोंदणी नसलेले पक्षही निवडणूक लढवत होते. मात्र, टी. एन. सेशन यांनी निवडणूक धोरण ठरविले. त्यावेळी शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून नोंद करणे क्रमप्राप्त झाले.शिवसेना हा राज्यस्तरावरील पक्ष आहे. राष्ट्रीय स्तरावरील नाही. घटनेमध्ये तरतूद केल्याप्रमाणे शिवसेना संघटनेचे प्रमुख म्हणून शिवसेनाप्रमुख हे होते. आयोगाच्या बंधनामुळे शिवसेनाप्रमुख हे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर शिवसेनेची पहिली कार्यकारिणी तयार करण्यात आली आणि नंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पक्षाची नोंदणी आयोगाकडे झालेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला शिवसेना कुठली आहे, कोणाची आहे हे माहिती आहे, असे ते म्हणाले...ती सर्व कागदपत्रे शिवसेनेकडेशिंदे गट शिवसेनेवर दावा करण्याच्या तयारीत आहे, याबाबत विचारता गीते म्हणाले की, निवडणूक आयोगाला नोंदणीच्या अनुषंगाने जी कागदपत्रे आवश्यक आहेत, ती सर्व कागदपत्रे शिवसेनेकडे उपलब्ध आहेत. पक्षप्रमुख योग्यवेळी ती आयोगाकडे सादर करतील. आयोगाच्या निर्देशानुसार पक्षांतर्गत निवडणुकाही यापूर्वी झालेल्या आहेत. यापुढेही त्या होत राहतील, असे ते म्हणाले. इतर कोणाच्या कार्यकारिणीशी मला घेणेदेणे नसून, मी शिवसैनिक आहे, कार्यकारिणीचा सदस्य आहे आणि ज्या कार्यकारिणीचा सदस्य आहे ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, असेही ते म्हणाले.गद्दार शब्द पचनी पडत नसेल तर..त्यांना गद्दार हा शब्द लागत असेल, पचनी पडत नसेल तर त्यांनी अगोदर आपण शिवसैनिक आहोत का, हे तपासून पाहणे आवश्यक आहे. ते शिवसैनिक असतील तर कुठलाही शिवसैनिक आपल्याच पक्षप्रमुखाला अवमानित करुन मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हायला लावेल का, असा प्रश्न त्यांनी केला.नाराज नव्हतो, कोरोनामुळे घरी होतोगेली दोन वर्षे अनंत गीते पक्षात सक्रिय नव्हते. त्याबाबत विचारण्यात आले असता, आपण नाराज नव्हतो. कोरोनाच्या काळात सगळेच घरी बसले होते. आपणही घरी बसलो होतो, असे त्यांनी सांगितले.ती बंड वेगळी, हे वेगळेनारायण राणे यांचे बंड हे व्यक्तिगत होते. नारायण राणे, छगन भुजबळ यांचे बंड आणि आताच बंड यात फरक आहे. छगन भुजबळ यांनी स्वत:च्या ताकदीवर बंड केले होते. त्या बंडाला काँग्रेसने सहकार्य जरूर केले. पण त्या बंडाची पुरस्कर्ती काँग्रेस नव्हती. बंडाचे कारस्थान काँग्रेसमध्ये शिजलेले नव्हते. आजचे बंड हे भाजप पुरस्कृत बंड आहे, असा आरोपही त्यांनी केला
पक्षप्रमुखांना अवमानित करणारा शिवसैनिक कसा?; आताचे बंड भाजप पुरस्कृत, अनंत गीतेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 2:51 PM