हर्षल शिरोडकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खेड: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज रविवारी शेकडो समर्थकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शहरातील महाड नाका येथील एसटी मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या जाहीर सभेत अखेर संजय कदम यांनी मशाल हाती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विश्वास काका कदम, विजय मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य नफिसा परकार, राजेंद्र आंब्रे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हाती शिवबंधन बांधले.
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा आज पार पडली. पक्ष प्रवेशानंतर माजी आमदार कदम यांनी रामदास कदम यांच्यावर सडकून टीका केली. आगामी काळात होणार्या जिल्हा परिषद. पंचायत समिती उध्दव ठाकरे शिवसेनेचे सभापती बसवु असा निर्धार व्यक्त केला. रामदास कदम यांची ताकद शिल्लक राहिली नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जो कोण उमेदवार द्याल त्याला निवडून देऊ असे आश्वासन दिले.
या सभेला शिवसेना नेते अनंत गीते,आमदार भास्कर जाधव, सचिव खासदार विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, खासदार अरविंद सावंत, उपनेते आमदार राजन साळवी, माजी पालकमंत्री रवींद्र वायकर, ॲड. अनिल परब, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके उपस्थित होते.