दापोली : खेड तालुक्यातील फुरूस-फळसोंडा येथे जंगलमय भागात ७ अजगरांची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर दापोली वन विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर दापोली वन विभागाने चौघांना ताब्यात घेतले असून, अन्य काहींचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दापोलीच्या वन विभागाने अटक केलेल्यांमध्ये जितेंद्र मिसाळ (वय ३२, रा. फुरूस - फळसोंडा), तज्जमुल परकार (४३, रा. फुरूस - गावठान), सलीम महाडिक (६०, रा. फुरूस - फळसोंडा), सुनील पाटील (५१, रा. फुरूस) या चौघांचा समावेश आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या सात मृत अजगरांचा शोध लागला. या व्हिडिओमध्ये फुरुस-फळसोंडा पोयनार या मार्गावरील जंगलमय भागात सात अजगर मारल्याचे दिसत होते. या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी वन विभागाने फुरुस भागातील जंगलात या अजगारांचा शोध सुरु केला. या शोध मोहिमेदरम्यान दफन केलेले अजगर दिसून आले. यामध्ये ११ फुटाच्या दोन मादी आणि साडेआठ ते १० फुटाच्या पाच नर अशा सात अजगरांचा समावेश होता.
येथील पशुवैद्यकीय कार्यालयात शवविच्छेदन केल्यानंतर दस्तुरीनजीक अजगरांची जाळून विल्हेवाट लावण्यात आली. याप्रकरणी ४ ग्रामस्थांवर भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अजगरांना नेमके कशासाठी मारले, याचा वनविभागाकडून कसून शोध सुरू आहे.चिपळूण येथील विभागीय वन अधिकारी विजय सुर्वे यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी सुरेश वरक, वनपाल अनिल दळवी, आर. आर. शिंदे, आर. डी. पाटील, संजय डुंडगे, एम. बी. पाटील, एम. जी. पाटील, जी. एम. जलने यांनी ही कारवाई केली आहे