फोटो मजकूर
सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने बुधवारी सकाळपासूनच ग्राहकांनी या बँकांसमोर गर्दी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेल्या आठवड्यात शनिवार, रविवार असे सलग दोन दिवस जोडून आलेली सुटी आणि त्यानंतर सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी राष्ट्रीय बँकांनी केलेला संप यामुळे सलग चार दिवस बँका बंद होत्या. बुधवारी या बँका सुरू होताच ग्राहकांनी सकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राष्ट्रीय बँकांसमोर दुपारपर्यंत रांग कायम होती.
सध्या मार्च अखेर असल्याने आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यात सर्व आस्थापना, शासकीय कार्यालये व्यग्र झाली आहेत. काहींच्या बिलाची रक्कम मार्चपूर्वी बँकेत जमा करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. काहींनी गृह, व्यवसाय आदी विविध प्रकारचे कर्ज घेतले असल्याने बँकेकडून लवकरात लवकर कर्ज मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी बँकांकडे वारंवार खेपा माराव्या लागत आहेत. याचबरोबर धनादेश जमा करणे, पैसे काढणे, धनाकर्ष काढणे, पैसे भरणे आदी अन्य दैनंदिन व्यवहारांसाठी ग्राहकांची सतत ये-जा सुरू असते.
राष्ट्रीय बँकांच्या कामकाजाचा आठवडा पाच दिवसांचा करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी बॅँकांना सुटी असते. त्यामुळे गेल्या आठवड्यात शनिवार, १३ रोजी तसेच रविवार १४ रोजी बँकांना साप्ताहिक सुटी होती. त्यानंतर सोमवार, १५ आणि मंगळवार १६ रोजी बँकांनी केंद्र सरकारच्या खासगीकरणाविरोधात संप पुकारल्याने १३ ते १६ मार्च या चार दिवसांच्या कालावधीत बँका सलग चार दिवस बंद राहिल्या. त्यामुळे ग्राहकांनी चार दिवस बँकांकडे पाठ फिरवली होती. या कालावधीत ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली;
मात्र बुधवारी या राष्ट्रीय बँका सुरू होताच सकाळपासूनच विविध आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दमछाक झाली होती. दुपारपर्यंत बँकांसमोर ग्राहकांची गर्दी दिसत होती.