रत्नागिरी : जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीने नामसाधर्म्याचे उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे. दापोली मतदारसंघात तब्बल चार संजय कदम आणि तीन योगेश कदम रिंगणात उतरले आहेत. त्याशिवाय चिपळूण मतदारसंघात दोन शेखर निकम आणि दोन प्रशांत यादव निवडणूक लढवत आहेत.पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात त्याच्या नावासारखे नाव असलेला दुसरा उमेदवार उभा करण्याची पद्धत गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये रायगड मतदारसंघात वापरण्यात आली होती. या लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघातही यावेळी हाच प्रकार करण्यात आला आहे.दापोलीमध्ये उद्धवसेनेकडून संजय कदम आणि शिंदेसेनेकडून विद्यमान आमदार योगेश कदम रिंगणात आहेत. त्यांनी आपले उमेदवारी अर्ज आधीच दाखल केले आहेत. मंगळवारी त्यांच्या नावाशी साधर्म्य असणारे उमेदवारी अर्ज दाखल झाले. येथे संजय कदम नावाच्या तीन, तर योगेश कदम नावाच्या दोन अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकाच मतदारसंघात चार संजय कदम आणि तीन योगेश कदम असे अर्ज दाखल आहेत.अशीच स्थिती चिपळूण मतदारसंघातही झाली आहे. येथे शेखर निकम (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि प्रशांत यादव (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) यांच्याच नावांचे उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी शेखर निकम (अपक्ष) आणि प्रशांत यादव (अपक्ष) असे अर्ज दाखल झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीत नामसाधर्म्याची रंगत; रत्नागिरी जिल्ह्यात चार संजय कदम, तीन योगेश कदम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:04 PM