चिपळूण : भरधाव बीएमडब्ल्यू कारने दिलेल्या धडकेने पार्क केलेली कार जवळ उभ्या असलेल्या चार जणांवर जाऊन आदळल्याने सावर्डे येथील चार शिक्षक जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास एन्क्लेव्ह येथे रविवारी रात्री हा अपघात झाला. विकास नलावडे (५८), देवराज मधुकर गरगटे (५०), मनोहर आगवेकर (६२) आणि सचिन कोल्हापुरे अशी जखमींची नावे आहेत.चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील चार शिक्षक १७ नोव्हेंबरला सहकुटुंब दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावनला रेल्वेने फिरण्यासाठी गेले होते. दक्षिण दिल्लीतील कैलास एन्क्लेव्ह भागातील एका हॉटेलमध्ये त्यांचा रविवारी १९ रोजी मुक्काम होता. सकाळी पुढील प्रवासासाठी त्यांची बसही तयार होती. रात्री जेवण झाल्यानंतर कुटुंबीय रूममध्ये गेले. चारही शिक्षक हॉटेलसमोरच रस्त्यालगत उभे होते.अशातच एक महिला वेगाने बीएमडब्ल्यू कार चालवत आली. या बीएमडब्ल्यू कारने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या मारुती कारला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, मारुती कार उलटली आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या या चौघांना धडकली. यात चौघेही जखमी झाले. त्यांना तातडीने एम्स रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील विकास नलावडे आणि सचिन कोल्हापुरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
काहींचा प्रवास रद्दसध्या शाळेला दिवाळी सुट्टी सुरू असल्याने काही शिक्षक सहकुटुंब दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन येथे फिरायला गेले होते. त्यांच्या सोबत अजूनही काही शिक्षक सहकुटुंब जाणार होते. मात्र ऐनवेळी काहींनी हा प्रवास रद्द केला. अशातच हे चौघेजण शुक्रवारी रेल्वेने दिल्ली येथे गेले असतानाच हा अपघात घडला.
आमदार शेखर निकम संपर्कातया अपघाताची माहिती मिळताच आमदार शेखर निकम यांनी तातडीने सूत्र हलवून त्यांना दिल्ली येथे तातडीने मदत होईल अशी व्यवस्था करून दिली. सावर्डेतील अन्य काही उद्योजकांनीही त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न केले.