रत्नागिरी : ‘मिरची रे मिरची आमच्या भैरीबुवाची सोन्याची खूर्ची’ यासारख्या फाका दररोज सुरू झाल्या आहेत. फाकपंचमीपासून गावात दररोजी होळी पेटविण्यात येत असून होळी भोवती ग्रामदेवतेच्या स्तुती करणाऱ्या तर मित्रांच्या, शेजाऱ्यांच्या नावाने मिश्किल फाक घालण्यात येत आहे. काही गावातून तर होळी पेटविल्यानंतर आटयापाट्याचा खेळही रंगत आहे. होळी पाैर्णिमा रविवार दि.२४ रोजी साजरी होणार असून दोन हजार ८४० खासगी तर सार्वजनिक एक हजार ३१२ होळ्या उभ्या केल्या जाणार आहेत. १५२० ग्रामदेवतांच्या पालख्या भाविकांच्या भेटीला येणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह वाढला आहे.
कोकणात शिमगोत्सव व गणेशोत्सव हे दोन सण उत्साहात साजरे करण्यात येतात. ग्रामदेवतेच्या पालख्या घरोघरी येत असल्याने भाविक नोकरी व्यवसायापासून गावापासून लांब राहत असले तरी आवर्जून परतात. कोकणात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी रेल्वे तर एसटी महामंडळाने जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे. खासगी वाहनांचे बुकींग सुरू आहे. जिल्ह्यात दि.२२ व २३ मार्च रोजी तेरसे तर दि.२४ व २५ रोजी भद्रे शिमगे साजरे करण्यात येणार आहेत.
होळी पाैर्णिमेला ग्रामदेवतेची पालखी सजविण्यात येते. पालखीला रूपे लावण्यात येतात. पालखी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर होळी तोडण्यासाठी जाते. होळीसह पालखी सहाणेवर विराजमान होते. दुसऱ्या दिवशी (दि.२५) पालखी, होळीसह होमाच्या ठिकाणी येते. होळी उभी केल्यानंतर होम पेटविला जातो. गाऱ्हाणे घातले जाते, नवविवाहित दांमप्त्य जोडीने होमात नारळ अर्पण करतात. काही गावातून रंगपंचमी पर्यत तर काही गावातून गुढीपाडव्यापर्यंत शिमगोत्सव साजरा करण्यात येणार आहे.